प्रशांत चंदनखेडे वणी:-
नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक जल्लोषात वणीकरांसाठी अविस्मरणीय ठरलेला क्षण म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील ‘टप्पू सेना’ (टप्पू, पिंकू व गोगी) यांची रंगतदार एन्ट्री. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या २०२५ च्या भव्य गरबा महोत्सवात या कलाकारांच्या उपस्थितीमुळे वणी शहराचा आनंद गगनात मावेनासा झाला.
२८ सप्टेंबर रोजी राम शेवाळकर परिसरात पार पडलेल्या या सोहळ्याला विक्रमी गर्दीची नोंद झाली. कलाकारांना थोडा उशीर झाला तरी नागरिकांचा उत्साह जराही ओसरला नाही. लहानगे, तरुणाई तसेच नागरिक आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी उशिरापर्यंत थांबले होते. टप्पू सेनेच्या कलाकारांचे स्वागत कु. मुक्ता उंबरकर (कन्या, राजू उंबरकर) यांनी केले. त्यानंतर या कलाकारांनी उपस्थितांशी संवाद साधत गरब्याच्या तालावर थिरकत वातावरणात चैतन्य निर्माण केले.
या प्रसंगी मनसे नेते राजू उंबरकर यांनी स्पष्ट केले की, “गरबा महोत्सवाचा मूळ उद्देश म्हणजे सांस्कृतिक परंपरा जपणे आणि समाजाला एका व्यासपीठावर एकत्र आणणे हा आहे.” टप्पू सेनेच्या उपस्थितीमुळे या उत्सवाला विशेष आकर्षण लाभले. यापूर्वी लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी या गरबा महोत्सवात रंगत आणली आणली होती.
पारंपरिक दांडिया–गरब्याच्या तालावर साजरा झालेला हा महोत्सव स्थानिक कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरला. विक्रमी गर्दीमुळे पोलिस प्रशासनाकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश कामारकर यांनी तर आभार प्रदर्शन गरबा महोत्सव समितीचे अध्यक्ष साहिल सलाट यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा मान्यवरांची मोठ्या संख्येने असलेली उपस्थितीही यावेळी लक्षवेधक ठरली.
टप्पू सेनेच्या एन्ट्रीमुळे यंदाचा वणीचा गरबा महोत्सव सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या दृष्टीने एक नवा मापदंड प्रस्थापित करत शहरवासीयांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवून गेला.
No comments: