वणी शहरात सोमवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास एका पानठेल्यासमोर गाडी लावण्यावरून झालेल्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने एका युवकावर लाठी काठी व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला चढविला. युवकाला काठी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आल्याने युवक गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी सहा आरोपींना तात्काळ अटक केली. तर दोन आरोपी पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आठही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता शहरातील एकता नगर समोरील एका पानठेल्यासमोर गाडी उभी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान मारहाणीत झाले. अंकुश मोगरे रा. सेवानगर या युवकाने पानठेल्यासमोर गाडी उभी केल्याने आरोपींनी त्याच्यासोबत घातलेला वाद नंतर चांगलाच चिघळला. आरोपींनी संगमत करून अंकुश मोगरे याच्यावर लाठी, काठी व लोखंडी रॉडने हल्ला चढविला. आरोपींनी हातातील काठ्या व लोखंडी रॉडने अंकुश मोगरे याच्या डोक्यावर व शरीरावर एकामागून एक वार केले.
दरम्यान अंकुश मोगरे याने आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत जखमी अवस्थेतच पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला तहसील कार्यालय परिसरात गाठले आणि त्याला रस्त्यावर खाली पाडून त्याच्या डोक्यावर लाकडी काठीने एका मागून एक वार केले. आरापी विलास चौहान याने अंकुश मोगरे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने वारंवार त्याच्या डोक्यावर काठीने प्रहार केले. त्याच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
अंकुश मोगरे याला जीवघेणी मारहाण करण्यात आल्याने भोलेश्वर नारायण ताराचंद (वय ४०, रा. सेवानगर, वणी, व्यवसाय-नोकरी, नगर परिषद वणी) यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विलास चौहाण, विशाल चौहाण, सूर्यभान चौहाण, विरसिंग उर्फ विरु लीवारे, दुर्गेश उर्फ सोनु चौहाण, अथर्व उईके व दोन अनोळखी व्यक्तींवर भा. न्या. सं. कलम १०९, १८९(१)(२)(३)(४), १९०, १९१(१)(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि सुदाम आसोरे हे करीत आहेत. या रक्तरंजित हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments: