प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणीच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात नामवंत व्यक्तिमत्व असलेले राजाभाऊ पाथ्रडकर हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आज १ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांचं व्ह्रदय विकाराने दुर्दैवी निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय ६८ वर्षांचं होतं.
शहरातील राम शेवाळकर परिसरातील स्नेहगौत्री इमारतीत वास्तव्यास असलेले राजाभाऊ पाथ्रडकर हे मागील अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. काँग्रेस पक्षाचे ते निष्ठावान पदाधिकारी होते. अनेक वर्षे त्यांनी काँग्रेस पक्षात निष्ठेने कार्य केलं. विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थेशीही ते जुळले होते. शांतता समितीचे ते सक्रिय सदस्य होते. त्यांची अचानक झालेली एक्झिट शहरवासीयांच्या मनाला चटका लावून गेली. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. कणखर व तडफदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची शहरात ओळख होती. नुकताच त्यांना एक मनाचा पुरस्कारही मिळाला होता. सुस्वभावी व मनमिळाऊ असं व्यक्तिमत्व असलेल्या राजाभाऊ पाथ्रडकर यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते.
नवरात्रौत्सवात ते धार्मिक कार्यात मग्न होते. जैताई मंदिरात भाविकांना प्रसाद वाटत असतांना त्यांना व्ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या पश्च्यात मुलगा, मुलगी असा मोठा आप्त परिवार आहे. नवरात्रोत्सवात जैताई मंदिरात मनोभावे सेवा देणाऱ्या राजाभाऊ पाथ्रडकर यांचं अचानक व्ह्रदय विकाराने निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या राहत्या घरून आज सायंकाळी ६.३० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शहरातील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
No comments: