Latest News

Latest News
Loading...

वरिष्ठ एमएसईबी कर्मचाऱ्याला तिघांची मारहाण व जीवघेण्या धमक्या; पोलिसांत गुन्हा दाखल


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी शहरातील आमेर टॉवर-३ जवळ शुक्रवारी रात्री एका एमएसईबी वरिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्यावर तिघांनी अचानक हल्ला करून शिवीगाळ, मारहाण तसेच जीवघेण्या धमक्या दिल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित भावेश विठ्ठल हरपरवार (वय ४१, रा. छोरीया ले-आऊट, वणी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

भावेश हरपरवार हे एमएसईबी कार्यालय, वणी येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून, ते आपल्या कुटुंबासह छोरीया लेआऊटमध्ये राहतात. शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर) रात्री ९.२० वाजताच्या सुमारास ते ड्युटीवरून घरी परतल्यानंतर आमेर टॉवर-३ जवळ ही घटना घडली.

फिर्यादीच्या माहितीनुसार, छोरीया ले-आऊट येथील तिघेजण आपापसांत वाद घालत असताना हरपरवार यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. यावेळी फिरोज अन्सारी याने हरपरवार यांना शिवीगाळ केली आणि चप्पलाने मारहाण केली. त्याचवेळी तेथील एक अल्पवयीन मुलगाही (वय १५) हरपरवार यांच्या अंगावर धावून आला आणि त्यानेही थपडा व बुक्क्यांनी मारहाण केली. सोनू उमरे याने देखील शिवीगाळ करत हरपरवार यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

यापेक्षा गंभीर म्हणजे, फिरोज अन्सारी याने हरपरवार यांच्या दुचाकीवरील फ्युज कॉल दांडा काढून त्यांच्यावर डोक्यात व पाठीवर वार केले. या हल्ल्यात हरपरवार यांच्या कपाळावर सूज आली असून डोक्यावर डेंबुर आल्याचे नमूद केले आहे.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून हरपरवार यांना आरोपींच्या तावडीतून सोडवले. मात्र, यानंतरही आरोपींनी “आमच्या वादात का आला, तुला ठार मारून टाकतो”, तसेच “रिपोर्ट दिलास तर अपघात करून तुझा व तुझ्या मुलाचा जीव घेईन” अशा धमक्या दिल्याचे हरपरवार यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पीडित व त्यांच्या कुटुंबाला जीविताचा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी फिरोज अन्सारी (वय अ. ४६ ), सोनू उमरे (वय अ.४६) व एका विधीसंघर्षग्रस्त बालकावर बीएनएसच्या कलम ११८(१), २९६, ३(५), ३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.