मुकुटबन येथील Rccpl Mp बिर्ला सिमेंट कंपनीच्या अन्यायकारक कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाने उभारलेले रणशिंग आज निर्णायक ठरले. मागील पाच दिवसांपासून सुरु असलेल्या आमरण उपोषणाकडे कंपनीने केलेले दुर्लक्ष अखेर जनतेच्या आक्रमक आंदोलनात परिवर्तित झाले. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कंपनीचे गेट उघडून थेट आत प्रवेश केला आणि परिस्थिती चिघळली.
मोठ्या पोलिस बंदोबस्ताच्या सावलीत घडलेल्या या घटनेने प्रशासनाची डोकेदुखी वाढवली. उपोषणकर्ते नेताजी पारखी, संदीप विंचू व संकेत गज्जलवार यांना कंपनीकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संयमाचा बांध फुटला.
त्यानंतर शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आमदार देरकर यांच्याशी संपर्क साधला. "मी स्वतः लक्ष घालतो," असे आश्वासन देत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रश्नावर दखल घेतल्याचेही स्पष्ट केले. तब्बल ५ तासांच्या चर्चेनंतर जनतेच्या बाजूने महत्त्वाचे निर्णय झाले.
आंदोलनातून घेण्यात आलेले ठोस निर्णय
कंपनीच्या कामगारांचा पगार Minimum Wages Act नुसार, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य, सिमेंटची रॅक लागणाऱ्या रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी १० दिवसांत कायमस्वरूपी तोडगा, येडशी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवले जाणार आणि रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न कंपनी प्रसाशन मार्गी लावणार.
या निर्णयांमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला व आमदार संजय देरकर यांना "जनतेचा खरा आवाज" म्हणून गौरवले.
आंदोलनकर्त्यांचा हक्कासाठी लढा
शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, साहायक सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे, तालुका प्रमुख सतीश आदेवार, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, सिताराम पिंगे, कुंदन टोंगे, कुंदन पेंदोर, यांच्यासह संतोष माहूरे, विनोद उप्परवार, मंगेश पाचभाई, अशोक पंधरे, दुष्यंत उपरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळाले.
🔥 आमदारांचा आक्रमक पवित्रा, जनतेचा विजय
मुकुटबनवासीयांच्या हक्काच्या लढ्यात आमदार संजय देरकर यांनी दाखवलेला आक्रमक पवित्रा कंपनीला झुकवून गेला. कंपनीच्या मुजोरपणाचा बुरुज जनतेच्या ऐक्याने खिळखिळा झाला असून हा विजय फक्त आंदोलनकर्त्यांचा नव्हे तर मुकुटबनच्या जनतेच्या हक्काचा आहे, असे मत आमदार संजय देरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
No comments: