प्रशांत चंदनखेडे वणी :-
वंचित, शोषित, आदिवासी व सर्वहारा समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर) मारेगावात ‘कार्यकर्ता मेळावा’ आणि ‘आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून होणाऱ्या या आंदोलनाद्वारे संघटित संघर्षाची गरज अधोरेखित केली जाणार आहे.
🔹 कार्यकर्ता मेळाव्यात चिंतन व दिशा
मारेगाव येथील बदकी भवन मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते समाजाच्या सध्याच्या स्थितीवर विचारमंथन करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “संघटित व्हा” या संदेशाचा संदर्भ देत समाजातील एकजूट आणि संघटनाची आवश्यकता अधोरेखित केली जाणार आहे. हा मेळावा केवळ राजकीय कार्यक्रम नसून सामाजिक दिशादर्शनाचा टप्पा ठरेल, असा आयोजकांचा दावा आहे.
🔹 तहसील कार्यालयावर धडकणार आक्रोश मोर्चा
मेळाव्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. हा मोर्चा मारेगाव तहसील कार्यालयावर जाऊन प्रशासनाला निवेदन सादर करणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी करणार आहेत.
🔹 प्रमुख मागण्या
१) बोधगया येथील महाबोधी महाविहाराचा कारभार तात्काळ बौद्ध समाजाकडे द्यावा.
२) शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करून सातबारा कोरा करावा.
३) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा.
🔹 वंचितचा निर्धार
सत्ताधारी मनुवादी व्यवस्थेमुळे वंचित, शोषित, आदिवासी आणि कष्टकरी वर्गावर अन्याय सुरूच असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे. त्यामुळे समाजाला संघटित करून न्याय्य हक्कांसाठी लढा उभारण्याचा निर्धार या कार्यक्रमातून अधोरेखित होणार आहे.
🔹 जनतेस आवाहन
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडीच एकमेव पर्याय असल्याचा दावा करत, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू निमसटकर यांनी केले आहे.
No comments: