वणीची दिपक चौपाटी बनली ‘जुगार चौपाटी’! “चेंगड” आणि “वरली मटका” जुगारावर पोलिसांची धडक कारवाई – एक जेरबंद, सूत्रधार फरार
प्रशांत चंदनखेडे वणी :-
दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढत्या गर्दीच्या काळातही वणी पोलिसांनी अवैध धंद्यांबाबत दक्षता बाळगत दिपक चौपाटी परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धडक कारवाई करत एकाला रंगेहाथ अटक केली. या धाडीत पोलिसांनी १२,२०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, मटका अड्ड्याचा मालक मात्र पसार झाला आहे.
दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दत्ता पेंडकर, पो.उपनि. धिरज गुल्हाणे, तसेच स्था.गु.शा. पथकाचे पोहेकॉ सुधीर पांडे, शेख सलमान आणि रजनीकांत मडावी हे सरकारी वाहनाने बंदोबस्तासाठी पेट्रोलिंग करीत असताना, दिपक चौपाटी परिसरात वरळी मटका व “चेंगड” नावाचा जुगार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेत छापा टाकला असता, सलिम चिकन सेंटर समोर हिरव्या ताडपत्रीआड काही इसम वरळी मटका व चेंगड नावाचा हारजितचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांना पाहताच काहीजण पळत सुटले, तर एक इसम मात्र घटनास्थळी रंगेहात सापडला.
मटका जुगार खेळतांना अटक करण्यात आलेल्या इसमाने आपले नाव संदीप प्रभाकर मडावी (वय ४०, रा. इंदिरा चौक, वणी) असे सांगितले. त्याच्याजवळून पोलिसांनी मटका जुगार खेळण्याकरिता उपयोगात येणारे साहित्य व रोख १२,२०० रुपये असा एकूण १३,५०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला.
पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, तो आरीफ रहमान खलील रहमान (रा. काळे ले-आऊट, वणी) याच्याकडे रोजंदारीवर काम करत असून, हा मटका अड्डा आरीफ रहमान याच्या मालकीचा आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा व सह कलम ४९ बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
फरार आरोपी आरीफ रहमानचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दत्ता पेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
No comments: