शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकांना अटक केल्याच्या निषेधार्थ आज पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी येथे शासकीय आढावा बैठकीसाठी आलेल्या आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांच्या वाहनांचा ताफा अडवून मंत्र्यांच्या वाहनासमोर लोटांगण घालून त्यांना काळे दुपट्टे दाखविणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र अतिवृष्टीने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन शिवसैनिकांनी मंत्र्यांच्या आढावा बैठकीकडे आपला मोर्चा वळविला. यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा या मागण्यांना घेऊन जोरदार घोषणा दिल्या.
शासकीय आढावा बैठकीत शिवसैनिकांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन प्रचंड गोंधळ घातल्याने पोलीसांनी १३ शिवसैनिकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज खासदार संजय देशमुख व आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या (उबाठा) वतीने पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलीसांनी पोलीस स्टेशनकडे वळण घेणाऱ्या रस्त्यावरच मोर्चा रोखून धरला. त्यामुळे खासदार व आमदारांनी प्रचंड रोष व्यक्त करीत ही उघड दडपशाही असल्याचा थेट आरोप केला.
वणी येथे शासकीय आढावा बैठक घेण्यात आल्याने आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके हे बैठकीकरिता आले होते. मात्र विद्यमान आमदारांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले नाही. वणी मतदार संघातील शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले असतांना स्थानिक लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याकरिता शासकीय आढावा बैठकीत आमंत्रित करण्यात न आल्याने शिवसैनिकांनी आढावा बैठकीकडे आपला मोर्चा वळविला. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दैनावस्था झालेली असतांना सरकारमधील मंत्री जिल्ह्यात ओला दुष्काळ व शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत देण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी मंत्र्यांच्या आढावा बैठकीत चांगलाच राडा घातला. त्यामुळे शिवसैनिकांना आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. शासकीय आढावा बैठकीत गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांच्यासह १२ शिवसैनिकांना पोलीसांनी मंत्र्यांचा ताफा अडविणे, वाहनासमोर लोटांगण घालणे आणि शासकीय आढावा बैठकीत गोंधळ घालणे या प्रकरणात अटक केल्याने रात्री उशिरापर्यंत आमदार संजय देरकर आणि शिवसैनिक पोलीस स्टेशनसमोर मोठ्या संख्येने ठिय्या मांडून होते. नंतर आमदारांनी रात्री शिवसैनिकांना आपापल्या घरी परतण्याचे आवाहन करतांनाच दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने विश्रामगृह येथे उपस्थित राहण्यास सांगितले. आज शिवसैनिकांसह वणी उपविभागातील शेतकरी विश्रामगृह येथे मोठ्या संख्येने जमा झाले. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खासदार संजय देशमुख हे देखील वणीला पोहचले. शेतकऱ्यांसाठी आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने खासदार संजय देशमुख आणि आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात आज पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला.
मात्र पोलीसांनी पोलीस स्टेशनकडे वळण घेणाऱ्या रस्त्यावरच मोर्चा रोखून धरला. त्यामुळे खासदार व आमदारांनी पोलीस प्रशासनाप्रती प्रचंड रोष व्यक्त केला. मोर्चेकरांना पोलीस स्टेशनकडे जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने मोर्चेकरांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः मोर्चेकरांजवळ येऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. त्यावेळी खासदार संजय देशमुख यांनी शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची पोलीस स्टेशनमधून तात्काळ सुटका करावी, अशी मागणी केली. तसेच त्यांनी सरकार व पोलीस प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.
शासनाने दडपशाही धोरण अवलंबलं असल्याचा आरोप करीत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबलं जात असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ ८ ऑक्टोबराला वणी-मारेगाव-झरी या तीनही तालुक्यात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी आमदार संजय देरकर यांनीही या दडपशाही धोरणाविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
No comments: