रेल्वे स्टेशन परिसरात रात्री उशिरापर्यंत वाजतात म्युजिक प्लेयरवर गाणी, आणि सुरु असते बेधुंद युवकांची हुल्लडबाजी
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी रेल्वे स्टेशन परिसरात रात्री उशिरापर्यंत म्युजिक प्लेयरवर मोठ्या आवाजात गाणी वाजवून संगीताच्या तालावर थिरकणाऱ्या युवकांच्या हुल्लडबाजीमुळे आसपासच्या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. कुठलेही निमित्त शोधून रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश आवाजात म्युजिक प्लेयरवर गाणी वाजविण्यात येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी वाजवून बेधुंद नाचणाऱ्या युवकांच्या हुल्लड व गोंधळ घालण्याने नागरिकांचा चांगलाच मनःस्ताप होऊ लागला आहे. नियमांना डावलून रात्री १२.३० ते १ वाजेपर्यंत म्युजिक प्लेयरवर बिनधास्त गाणी वाजविली जात आहे. पोलिसांची रेल्वे स्टेशन परिसरात क्वचितच गस्त होत असल्याने या हुल्लडबाजांचे चांगलेच फावत आहे. रेल्वेचे अधिकारी व स्टेशन मास्टरही याकडे डोळेझाक करतांना दिसत आहे. त्यामुळे पोलीसांनी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी वाजवून हुल्लड घालणाऱ्यांवर आवर घालावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
शहरातील रेल्वे स्टेशनलगत मोठी रहिवाशी वस्ती आहे. मागील दोन दिवसांपासून रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या आवाजात म्युजिक प्लेयरवर गाणी वाजविण्यात येत असल्याने नागरिकांमधून कमालीचा मनःस्ताप व्यक्त होत आहे. एवढेच नाही तर संगीताच्या तालावर थिरकताना रात्री जोरजोरात ओरडणे, किळसवाणे शब्द प्रयोग करणे, हुल्लड घालणे हे प्रकारही पाहायला मिळत आहे. ६ ऑक्टोबराला कोजागिरी असल्याने रेल्वे स्टेशन परिसरात हा सण साजरा करण्यात आला. त्यावेळीही रात्री उशिरापर्यंत नियमबाह्य पद्धतीने म्युजिक प्लेयरवर गाणी वाजविण्यात आली, मात्र याबद्दल वाद नाही. पण काल ७ ऑक्टोबराला केवळ निमित्त शोधून रात्री १२.३० ते १ वाजेपर्यंत अगदी रेल्वे स्टेशन समोर मोठ्या आवाजात गाणी वाजवून गोंधळ व धिंगाणा घालण्यात आला. संगीताच्या तालावर जोरजोरात ओरडून बेधुंद नाचणारे युवक मध्यरात्र झाल्याचेही भान विसरले.
आपल्या रात्री उशिरापर्यंत हुल्लड घालण्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होईल, ही देखील जाणीव त्यांना राहिली नाही. स्टेशन मास्टर किंवा रेल्वेच्या कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली नाही. रेल्वे क्वार्टरमध्ये रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही परिवार वास्तव्यास आहे. युवकांच्या रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हुल्लडबाजीमुळे त्यांच्या परिवाराला त्रास झाला नसावा काय. मात्र तरीही या हुल्लडबाज युवकांच्या गाणी वाजविण्यावर अधिकारी मौन बाळगून होते. पण रेल्वे स्टेशन परिसराला लागून बऱ्याच रहिवाशी वस्त्या आहेत. त्यांना मात्र रेल्वे स्टेशन समोर रात्री उशिरापर्यंत मोठमोठ्याने वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागला. म्युझिक प्लेयरवर मोठ्या आवाजात गाणी वाजविणे, गोंधळ घालणे, यामुळे अनेकांची झोपमोड झाली. याच धुंद नाचणाऱ्या युवकांमध्ये शुल्लक कारणावरून वाद होऊन एखादी अपराधीक घटना घडल्यास कायदा व सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.येथे बऱ्याच सरकारी व खाजगी नोकरदारवर्गाचं वास्तव्य आहे. त्यांना कामावर जाण्याकरिता सकाळी लवकर उठावं लागतं. शाळकरी विद्यार्थ्यांनाही सकाळी शाळेत जाण्याकरिता पहाटे उठावं लागतं. आजारग्रस्तांनाही रात्रीची निवांत झोप आवश्यक असते. मात्र रात्री मोठमोठ्याने गाणी वाजविण्याने त्यांची झोपमोड होऊन त्यांच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्री बेरात्री सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि हुल्लड घालणाऱ्यांना आवर घालणे गरजेचे झाले. त्यामुळे पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातही रात्रीची गस्त घालावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
No comments: