अपहरणानंतर खून! चार महिन्यांच्या सूडाने घेतला वृद्धाचा बळी, बायकोला पळवून नेल्याचा राग काढला वडिलांवर
प्रशांत चंदनखेडे वणी
युवकाने विवाहित महिलेला पळवून नेल्याने सूडभावनेने पेटलेल्या पतीने युवकाच्या वडिलांना यमसदनी धाडल्याची थरकाप उडविणारी घटना शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. वणी तालुक्यातील चिखलगाव परिसरात राहायला आलेल्या वृद्धाचे अपहरण करून त्याचा निर्दयीपणे खून करण्यात आला. ही धक्कादायक व मन हेलावणारी घटना ६ ऑक्टोबरला सकाळी उघडकीस आली. चार महिन्यांपूर्वी युवकाने आरोपीच्या पत्नीला पळवून नेल्याने सुडभावनेतून आरोपीने युवकाच्या वृद्ध वडिलांचे अपहरण करून त्यांचा निर्दयीपणे खून केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. युवकाने बायकोला पळवून नेले आणि नवऱ्याने त्याचा राग युवकाच्या वडिलांवर काढला. मुलाने केलेल्या कारनाम्यामुळे वडिलांचा नाहक बळी गेल्याच्या प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.
या घटनेबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात प्रिया विनोद तिरणकर (वय २७, रा. झरी ता. झरी, मूळचे रा. बोरगाव ता. वणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील विनायक माधव कुडमेथे (रा. जुना सोमठाणा, ता. भद्रावती जि. चंद्रपूर) यांचा निलेष दिलीप ढोले (रा. सोमठाणा) या व्यक्तीने निर्घृण खून केल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
🔥 पार्श्वभूमी : भावाने पळवली आरोपीची पत्नी — आणि सुरू झाला सूडाचा खेळ
चार महिन्यांपूर्वी फिर्यादीच्या भावाने निलेष ढोले याच्या पत्नीला पळवून नेले होते. याच घटनेचा राग मनात धरून निलेष ढोले सतत धमक्या देत होता. भीतीपोटी विनायक कुडमेथे हे पत्नीसह वणी तालुक्यातील चिखलगाव येथे आपल्या बहिणीकडे राहायला आले. चिखलगाव येथेच मजुरी करून त्यांनी आपली उपजीविका सुरू केली होती.
🚗 ५ ऑक्टोबरचा थरार : पांढऱ्या वाहनातून अपहरण
५ ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास विनायक कुडमेथे आणि त्यांचा नातू (वय १०) किराणा सामान आणण्यासाठी वणीला गेले होते. गंधारे किराणा दुकानासमोर पांढऱ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या निलेष ढोले व त्याच्या एका साथीदाराने विनायक कुडमेथे यांना शिवीगाळ करून मारहाण केली व जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले.
काही वेळाने त्यांचा नातू रडत घरी आला आणि घडलेला प्रकार त्याने आपल्या आईला सांगितला. नंतर कुटुंबियांनी त्यांची तातडीने शोधमोहीम सुरू केली, परंतु त्यांचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही.
⚰️ दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
दुसऱ्या दिवशी ६ ऑक्टोबराला सकाळी बेलोरा फाटा परिसरात विनायक कुडमेथे हे जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, वणी येथे हलविले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. या घटनेने वणी आणि भद्रावती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
👮 तपासाचा धडाका — आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक सक्रिय
शिरपूर पोलिस ठाण्यात निलेष दिलीप ढोले (वय ४०) आणि त्याच्या अनोळखी साथीदाराविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. प्राथमिक तपासात हा सूडभावनेतून घडलेला नियोजित खून असल्याचे उघड झाले आहे.
🕯️ ग्रामस्थांत संताप – “सूडासाठी जीव घेणं अमानुष!”
या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरातील नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. सुडापोटी एका वृद्धाचा जीव घेणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी कुटुंबियांमधून होऊ लागली आहे.
📍 या घटनेबाबत प्रिया तिरणकर यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी निलेश ढोले व त्याच्या एका साथीदारावर बीएनएसच्या कलम १०३, १४०, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथक आरोपींचा कसून शोध घेत आहे. आरोपींचा शोध घेण्याकरिता तपास यंत्रणाही कामी लावण्यात आल्या आहेत.
No comments: