अपघातामुळे अपंगत्व आलं, आणि आयुष्य थांबलं असं अनेकांना वाटलं असतं. पण अपघातात कंबरेखाली अपंगत्व येऊनही स्वबळावर उभं राहण्याची जिद्द ठेवणारे तरुणही आहेत. त्यांची प्रेरणा व आदर्श प्रेत्येकानेच घेण्यासारखा आहे. वणीतील एका तरुणाने परिस्थितीवर मात करत जिद्दीने स्वतःचं आयुष्य नव्याने उभं करण्याचा निर्धार केला. या आत्मनिर्भर प्रवासाला “स्माईल फाउंडेशन” या सेवाभावी संस्थेने हातभार लावला असून, त्या तरुणाला संगणक संच, टेबल आणि आवश्यक साहित्य भेट देत त्याच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे.
स्माईल फाउंडेशन ही संस्था आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या तीन तत्त्वांवर काम करते. सामाजिक बांधिलकी जपत, संस्थेने वणीतील गुरुनगर परिसरातील या दिव्यांग तरुणाच्या आत्मनिर्भरतेसाठी पुढाकार घेतला. संस्थेचे सदस्य सुभाष आत्राम यांच्या हस्ते त्याला ही साहित्यरूपी मदत देण्यात करण्यात आली.
💪 जिद्दीची कहाणी
हा तरुण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढला. लहानपणीच घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावत कामाला लागला, पण कामावर असताना झालेल्या अपघातात त्याला कंबरेखाली अपंगत्व आले. मात्र, निराश होण्याऐवजी त्याने आपल्या कलागुणांच्या जोरावर नव्या वाटा शोधण्यास सुरुवात केली.
चित्रकलेत निपुण असलेला हा युवक आता डिजिटल डिझायनिंग, ऑनलाइन कोर्सेस आणि तांत्रिक कौशल्ये आत्मसात करत असून, संगणकाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्याचं स्वप्न केवळ स्वतःचं नव्हे, तर कुटुंबालाही आर्थिक आधार देण्याचं आहे.
🌈 समाजातील संवेदनशीलता वाढविणारा पुढाकार
स्माईल फाउंडेशनच्या या कार्याने समाजात सकारात्मकतेचा आणि संवेदनशीलतेचा संदेश दिला आहे. “उज्वल भविष्यासाठीची प्रेरणा” ठरणाऱ्या या उपक्रमासाठी संस्थेचे सदस्य पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, तन्मय कापसे, अनिकेत वासरिकर, कार्तिक पिदुरकर, जगदीश गिरी, कुणाल आत्राम, निकेश खाड़े, प्रसाद पिपराडे, गौरव कोरडे, तुषार वैद्य, सचिन भोयर, सचिन काळे, मयूर भरटकर आणि भूषण पारवे यांनी विशेष सहकार्य केले.
हा उपक्रम केवळ एका दिव्यांग तरुणाच्या जीवनात प्रकाश आणणारा ठरला नाही, तर "जिद्द असेल तर अपंगत्वही हतबल होतं" हा संदेश देणारा ठरला आहे.

No comments: