वणी शहरातील एका परिसरात घडलेल्या रहस्यमय घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सर्व कुटुंबीय घरात झोपून असताना 10वीत शिकणारी 15 वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या घरातून बेपत्ता झाली असून, तिच्या आईने वणी पोलिसात दिलेल्या तक्रारीत मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी (जन्म : 11 एप्रिल 2010) ही शहरातीलच एका विद्यालयात दहाव्या वर्गात शिकते. 2 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास संपूर्ण कुटुंब जेवण करून झोपले होते. मात्र मध्यरात्री एकच्या सुमारास मुलीच्या आईला जाग आली असता त्यांना मुलगी खोलीत दिसली नाही.
त्यामुळे त्यांना धक्काच बसला. त्या तात्काळ घरातून बाहेर आल्या, तेव्हा त्यांच्या सासू पाणी भरत असल्याचे दिसले. त्यांनी मुलीबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी मुलगी खाली आलीच नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने घर, शेजार, तसेच वणी शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलगी कुठेही आढळली नाही.
फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी यापूर्वी कधीही न सांगता घरातून बाहेर पडली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून किंवा काही तरी बहाणा करून घरातून बाहेर नेले असावे, असा त्यांचा संशय आहे.
या प्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून मुलीचा शोध सुरू केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “सर्व संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत असून, मोबाईल लोकेशन व मित्रपरिवारालाही विचारपूस करून तपास केला जात आहे.”

No comments: