उच्च शिक्षित व युवा कार्यकर्ता पंकज कांबळे पंचायत समिती निवडणूक लढण्याच्या वाटेवर, राजूर गणातून कसली कंबर
प्रशांत चंदनखेडे वणी :-
युवावर्ग स्थानिक स्वराज्य स्थंस्थेच्या निवडणुका लढण्यास उत्स्फूर्तपणे पुढे येऊ लागल्याने राजकारणाला कलाटणी मिळण्याची चर्चा रंगू लागली आहे. नेहमी त्याच त्या नेत्यांच्या आणि प्रस्थापितांच्या भोवती फिरणारं राजकारण आता युवावर्गाच्या आव्हानामुळे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशाचा कणा असलेला युवक राजकारणात सक्रिय होऊ लागल्याने मात्तबरांच्या चिंता वाढल्या आहेत. नव्या दमाचे युवक नेतृत्व करण्यास सज्ज झाल्याने त्यांना आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळणे गरजेचे झाले आहे. युवावर्ग निवडणूक रिंगणात उतरल्यास जनतेला तळमळीने कार्य करणारे लोकप्रतिनिधी मिळू शकतात. तसेच युवा व तडफदार उमेदवारांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्यास राजकारणात मोठा फेरबदल होऊन नागरिकांना स्वच्छ प्रतिमा व निस्वार्थ भावनेने कामे करणारे लोकप्रतिनिधी लाभणार आहेत. राजकारणाकडे युवकांचा ओढा वाढत असतांनाच राजूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला सुशिक्षित युवकही पंचायत समिती निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागला आहे. राजूर गणातून तो विजयाच्या धेय्याने निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
राजूर (कॉ.) ही जन्मभूमी असलेला पंकज कांबळे हा युवक राजूर गणातून पंचायत समितीची निवडणूक लढणार असून त्याने विजयाचे धेय्य बाळगून कंबर कसली आहे. पंकज हा कर्तबगार व होतकरू युवक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून तो घडला आहे. स्वतःच्या बळावर त्याने स्वतःला सिद्ध केलं असून स्वबळावर त्याने आपलं विश्व उभारलं आहे. वडील शिंपी काम करायचे. नंतर त्यांनी हात टेकले. कुटुंबाची व स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारीही पंकजवर आली.
अतिशय कमी वयात त्याला कोळसा क्षेत्रात कामे करावी लागली. कामे करून कुटुंबाला हातभार लावत त्याने शिक्षणही सुरु ठेवलं. जिथे परिस्थितीसमोर तरुण गुढगे टेकतात तशा परिस्थितीत त्याने जिद्दीने शिक्षण घेतले. थोडेफार नाही तर तो उच्च शिक्षित झाला. बीए, एमए नंतर इलेक्ट्रिकल इंजिअर डिप्लोमा आणि बी-टेक व आता तो मास्टर ऑफ बिझनेसमध्ये लॉजिस्टिक अँड सप्लाय चैन ही पदवी घेत आहे. परिस्थितीशी संघर्ष करून तो आज यशस्वी झाला आहे. आणि चांगल्या हुद्द्यावर देखील आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्याला वलय प्राप्त आहे. राजूर येथील काही आंदोलनं त्याच्या नेतृत्वात झाली आहे. सामाजिक कार्यात तो नेहमी पुढे असतो. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा तो पाईक आहे. युवा कार्यकर्ता म्हणून तो गावात ओळखला जातो. राजकारणातही तो रुची ठेवतो. नागरिकांची अडली नडली कामे करण्यात तो नेहमी पुढाकार घेतो. राजूर दीक्षाभूमी विहार समितीचा तो उपाध्यक्ष असून त्याने विविध सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. निस्वार्थ वृत्तीने कार्य करण्याची त्याची तळमळ आता त्याला लोकांचा हक्काचा लोकप्रतिनिधी बनायची आहे.
पंचायत समिती गणाच्या आरक्षणात राजूर गण हा अनुसूचित जातीसाठी (महिला/पुरुष) राखीव असल्याने त्याने आता निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी चालविली आहे. बहुजन समाज पार्टीचा वणी विधानसभा क्षेत्राचा तो महासचिव राहिला आहे. तसेच भीम आर्मीचाही तो तालुकाध्यक्ष आहे. अनेक वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय असून समाजकार्यातही तो नेहमी पुढाकार घेतो. लोकांसाठी झटणारे स्वच्छ प्रतिमेचे तरुण राजकारणात यायला हवे, ही चर्चा सुज्ञ नागरिकांमधून नेहमी ऐकायला मिळते. तेंव्हा हे नव्या दमाचे युवक लोकप्रतिनिधी म्हणून योग्य निवड ठरू शकतात, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

No comments: