वणी परिसरातील कोळसाखाणींमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार संजय देरकर यांनी वेकोली अधिकाऱ्यांना दिल्या. ऊर्जाग्राम ताडाळी (चंद्रपूर) येथील वेकोली कार्यालयात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध गावांतील प्रश्न उपस्थित करत त्वरित कारवाईचे निर्देश दिले.
या बैठकीस वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार देरकर म्हणाले, “खाण परिसरातील बाभळीच्या जंगलामुळे वाघांचा वावर वाढला असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या भागाचे सर्वेक्षण करून झाडझुडपे तातडीने साफ करावीत. तसेच वेकोलीशी संलग्न कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे.”
बैठकीत प्रदूषणामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देणे, उकणी गावातील प्रलंबित जमिनीचे अधिग्रहण पूर्ण करणे, तसेच गावांमध्ये आरोग्य सुविधा वाढविणे या ठोस मुद्द्यांवर चर्चा झाली.
वेकोली अधिकाऱ्यांनी आमदारांच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत काही ठोस निर्णयांची घोषणा केली. प्रदूषणग्रस्त गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे (हेल्थ कॅम्प) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. चारगाव चौकी ते शिंदोला मार्गावर दोन दिवसांत पाण्याचे टँकर फिरवले जाणार असून, सीएसआर निधीतून पांदण रस्ते आणि मूलभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
बैठकीदरम्यान स्थानिकांनी ओव्हरबर्डन व घुग्गुस भागातील भूस्खलन पीडितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
या बैठकीस वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, सरपंच रुपेश ठाकरे, ज्ञानेश्वर टोंगे, स्वाती राजुरकर, अजय चटप, डॉ. विलास बोबडे, लुकेश्वर बोबडे, संदीप थेरे, राजू यादव, दिलीप ताजने, चेतन बोबडे, संदीप जेनेकर, नरेंद्र नांदे आदींसह नायगाव, टाकळी, कोलगाव, साखरा, निलजई, बेलोरा, मुंगोली, शिवणी जहांगिर, उकणी व चिंचोली गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments: