मारेगावहून तीन बालकांचे अपहरण करणारा अट्टल आरोपी जेरबंद! यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई; तिन्ही बालकांची सुखरूप सुटका
प्रशांत चंदनखेडे वणी :-
मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन अल्पवयीन मुलामुलींचे अपहरण करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे थरारक कारवाईत जेरबंद केले. या कारवाईत तीनही बालकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, आरोपीला मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
🔎 ‘ऑपरेशन शोध मोहीम’ अंतर्गत कारवाई
जिल्ह्या पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन मुला–मुलींच्या अपहरण व बेपत्ता प्रकरणांचा तपास गतीमान करण्यासाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीम सुरू आहे.
या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत नोंद असलेल्या अपहरण प्रकरणांचा समांतर तपास सुरू केला होता.
याच मोहिमेदरम्यान मारेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भा.दं.सं. कलम १३७(२) अंतर्गत तीन अल्पवयीन बालकांच्या अपहरणाचा तपास सुरू होता.
तपासादरम्यान ३ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी देविदास अंगादास वावरे (वय ४४, रा. पांढरकवडा, सध्या किनगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) हा पिडीत बालकांसह किनगाव येथे लपून बसला आहे.
⚡ क्षणाचाही विलंब न करता छापा
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांना कळवून तत्काळ पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना झाले. किनगाव येथे छापा टाकत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या ताब्यातील तीनही अल्पवयीन मुलामुलींची सुखरूप सुटका करण्यात आली. आरोपीच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या बालकांना मारेगाव येथे आणून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
⚖️ आरोपीचा गुन्हेगारी इतिहास उघड
तपासादरम्यान उघड झाले की, आरोपी वावरे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर आदिलाबाद टाउन व ग्रामीण (राज्य तेलंगणा) तसेच अंबाझरी (नागपूर) पोलीस ठाण्यांत विविध गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे त्याला अटक करणे ही पोलिसांसाठी आव्हानात्मक मोहीम ठरली होती.
👮♂️ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाची धडाडी
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (वणी) सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सपोनि दत्ता पेंडकर, पो.उ.नि. धनराज हाके, पोहवा सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, पोका सलमान शेख, रजनीकांत मडावी आणि चालक नरेश राऊत यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण सुळे (पो.स्टे. मारेगाव) हे करीत आहेत.
यवतमाळ पोलिसांच्या या वेगवान आणि अचूक कारवाईमुळे तीन निरागस बालकांचे प्राण वाचले असून, जिल्ह्यात पोलिस दलाबद्दलचा जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

No comments: