रेल्वे स्टेशनजवळील गौरकार ले-आऊट येथे डीपी रोडवर पक्के बांधकाम, येथील रहिवाशांचा जाण्यायेण्याचा मार्गही केला बंद
लोकसंदेश न्यूज वृत्तांकन :-
वणी रेल्वे स्टेशन जवळील गौरकार ले-आऊट येथून होणारा प्रस्तावित डीपी रोड एका व्यावसायिकाच्या बांधकामामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गौरकार ले-आऊट (रेल्वे स्टेशन जवळ) परिसरालगत शंभर फूट खुल्या असलेल्या जागेवर डीपी रोड होणार असल्याचे अनेक वर्षांपासून सांगण्यात येत आहे. मात्र डीपी रोड होणार असलेल्या जागेवर एका व्यावसायिकाने मालकीहक्क सांगून पक्के बांधकाम केल्याने डीपी रोडबाबत आता नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर याठिकाणी हक्काच्या जागेवर घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांचा जाण्यायेण्याचा मार्गही या व्यावसायिकाने बंद केल्याने येथील नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होत असून नागरिकांचे मार्गक्रमणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी येथील रहिवाशांमधून होऊ लागली आहे.
वणी वरोरा मार्गाला जोडणारा प्रस्तावित डीपी रोड शहरातील गौरकार ले-आऊट परिसरातून जाणार असल्याचे अनेक वर्षांपासून सांगण्यात येत आहे. रेल्वे विभागाच्या संरक्षण भिंतीपासून १०० फुटांचा डीपी रोड होणार असल्याचे सांगितले जात असतांना प्रस्तावित डीपी रोडच्या खुल्या जागेवर मात्र एका व्यावसायिकाने पक्के बांधकाम केले आहे. डीपी रोड होणार असलेल्या जागेवर या व्यावसायिकाने मालकीहक्क सांगितल्याने डीपी रोडबाबत आता नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर या व्यावसायिकाने अनेक वर्षांपासून या परिसरात घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांच्या जाण्यायेण्याचाही मार्ग बंद केल्याने येथील नागरिक कोंडीत सापडले आहेत.रेल्वे स्टेशन जवळील ले-आऊटमध्ये हक्काची जागा खरेदी करून काही जण अनेक वर्षांपासून येथे आपली घरे बांधून राहत आहेत. तसेच येथे मंडप डेकोरेशनच्या साहित्याचे एक मोठे गोदाम देखील आहे. येथील रहिवाशांना जाणे येणे करण्याकरिता रेल्वे संरक्षण भिंतीजवळून एक रस्ता तयार करून देण्यात आला होता. हा रस्ता एका व्यावसायिकाने बांधकाम करून पूर्णपणे बंद केल्याने येथील नागरिकांच्या मार्गक्रमणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. व्यावसायिकाने जाण्यायेण्याचा रस्ता बंद केल्याने येथील एका रहिवाशाचा या व्यावसायिकासोबत टोकाचा वाद देखील झाला होता.
नंतर हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले. तसेच या व्यावसायिकाने रस्ता बंद केल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र अजूनही रस्ता मोकळा करून देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. स्वमालकीहक्काच्या जागेवर घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना जाण्यायेण्याचा रस्ताच राहिला नसल्याने त्यांच्यावर अन्यायकारक परिस्थिती ओढवली आहे. रस्त्याअभावी त्यांना जाणे येणे करतांना मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. एवढेच काय तर जाण्यायेण्याचा रस्ता बंद करण्यात आल्याने येथील नागरिकांची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
येथील रहिवाशांच्या मार्गक्रमणाच्या रस्त्यावर या व्यावसायिकाने पक्के बांधकाम केल्याने त्यांना रेल्वेच्या फुटलेल्या संरक्षण भिंतीतून जाणे येणे करावे लागत आहे. येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तर रेल्वेचे लोखंडी साहित्यही याठिकाणी मोठ्या प्रमाणात पडून असल्याने महिला व शाळकरी मुलांना जाणे येणे करतांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात गुडघ्याएवढ्या पाण्यातून येथील रहिवाशांना जाणे येणे करावे लागते. भयावह म्हणजे पाण्यातून मार्ग काढतांना एका महिलेच्या पायाला साप गुंडाळला होता. मात्र तिचे दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला.
याठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये काही जण गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना वेळोवेळी रुग्णालयात दाखल करावं लागतं. मात्र त्यांच्या घराकडे जाणारा रस्ताच बंद करण्यात आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची तातडीची गरज भासल्यास रुग्णवाहिका किंवा अन्य वाहन घरापर्यंत न्यायचं कसं, हा प्रश्न येथील नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे येथे एक शेतकरी कुटुंब देखील वास्तव्यास असून या शेतकऱ्याला घरापर्यंत बैलबंडी नेणे कठीण झाले आहे. अशातच रेल्वे विभागाने संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीचे काम केल्यास येथील नागरिकांचा रेल्वे हद्दीतून जाणे येणे करण्याचाही रस्ता बंद होईल, आणि येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांची कोंडी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून येथील नागरिकांचा जाण्यायेण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी आग्रही मागणी येथील नागरिकांमधून होऊ लागली आहे.


No comments: