Latest News

Latest News
Loading...

शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात शुल्लक वादातून हाणामारी — दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील नगर परिषदजवळील संकट मोचन हनुमान मंदिर परिसरात एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात किरकोळ वादातून प्रचंड राडा झाला. एकमेकांना अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देतानाच दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी वणी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणी करण्यात आलेल्या पहिल्या तक्रारीत सपना देवनारायण जोशी (वय 40) यांनी पुजा जोशी, हर्षा शर्मा, राहुल जोशी आणि रुपेश जोशी या चौघांवर हल्ला चढवून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, घराच्या वाटणीवरून सुरु असलेला जुना वाद पुन्हा चिघळला आणि हा वाद यावेळी मारहाणीपर्यंत पोहचला. घरी वेल्डिंगचे काम करायचे असल्याने सपना जोशी यांनी वेल्डिंग करणाऱ्याला घरी बोलाविले असता आरोपींनी त्याला हाकलून लावले. आणि त्यानंतर सपना जोशी व त्यांच्या कुटुंबियांशी वाद घालायला सुरु केली. हा वाद नंतर चांगलाच चिघळला आणि वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी प्रचंड गोंधळ घालत देवनारायण जोशी यांना लाकडी दांडा व हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच मध्यस्थी करण्यास गेलेल्या सपना जोशी यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारून त्यांना जखमी केले. एवढेच नाही तर “ पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यास पुन्हा मारहाण करू आणि मुलीचे करिअर उद्ध्वस्त करू” अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे सपना जोशी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी पूजा राहुल जोशी, हर्षा अमर शर्मा, राहुल महेश जोशी व रुपेश महेश जोशी यांच्यावर बीएनएसच्या कलम ११५(२), ११८(१), ३(५), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

दुसऱ्या तक्रारीत पुजा राहुल जोशी (वय 26, रा. संकट मोचन हनुमान मंदिराजवळ) यांनी शेजारी राहणारे देवनारायण रामगोपाल जोशी, त्यांची पत्नी सपना जोशी आणि त्यांच्या मुलीवर अश्लील शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. पुजा जोशी यांच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या गेटवरील लोखंडी सळाख काढण्यावरून वाद निर्माण झाला. त्या वादातून मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. देवनारायण जोशी यांनी हातात लोखंडी रॉड घेऊन धमकी दिली, तर पत्नी व मुलीने केस ओढून, कपडे फाडून, व अश्लील शिवीगाळ करून “जिवाने मारून टाकू” अशी धमकी दिली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी देवनारायण रामगोपाल शर्मा, सपना देवनारायण शर्मा व त्यांच्या मुलीवर बीएनएसच्या कलम ११५(२), २९६, ३(५), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि धमकीचे आरोप करण्यात आले असून, पोलिसांनी दोन्ही तक्रारी नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दोन्ही पक्षांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, प्रत्यक्षदर्शींची चौकशी करून घटनेचे सत्य स्वरूप समोर आणले जाईल, असे वणी पोलिस ठाण्यातील सूत्रांनी सांगितले आहे.


No comments:

Powered by Blogger.