प्रशांत चंदनखेडे वणी :-
राजूर या गावात गेल्या काही दिवसांपासून रोगाने ग्रासलेल्या आणि पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असून, नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात अनेक ठिकाणी केसगळती, जखमा आणि त्वचारोगाने पीडित कुत्री मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. हे पिसाळलेले कुत्रे नागरिकांच्या अंगावर धाव घेणे, लहान मुलांचा पाठलाग करणे, तसेच नागरिकांच्या घरात शिरत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करून या भटक्या व एका विशिष्ट रोगाने ग्रासलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या रोगट कुत्र्यांपासून रेबीजचा धोका असून या कुत्र्यांच्या मुक्त संचारामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भटक्या कुत्र्यांवर आलेला हा रोग जर संसर्गजन्य असेल तर त्याचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ही कुत्रे विशेषतः शाळा परिसर, अंगणवाडी आणि बाजारपेठ भागात मोठ्या प्रमाणात दिसत असून, या पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या रोगट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.
ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना दिलेल्या लेखी तक्रार अर्जात म्हटले आहे की, “या पिसाळलेल्या कुत्र्यांपासून गावातील नागरिकांचा बचाव करणे गरजेचे झाले असून या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ विल्हेवाट न लावल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. तक्रार अर्जावर सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या राजूर विभाग उपाध्यक्षा दिशा फुलझेले, युवासेना राजूर शाखा प्रमुख अमृत फुलझेले, यशोधरा देवगडे, सिमा शंभरकर, सोनाली भुसारी, योगेश पाटील, निरजू खोब्रागडे, संगिता उपरे, पुरुषोत्तम आत्राम, सोनाली थूल यांच्यासह ३८ गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावात आरोग्य आणि सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर बनले आहेत, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

No comments: