Latest News

Latest News
Loading...

नगर पालिका निवडणूक महासंग्राम! पक्ष नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, गड राखण्याचे प्रस्थापितांपुढे आव्हान, अपक्षही देतील कडवी झुंज


प्रशांत चंदनखेडे वणी :-

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष सज्ज झाले असून राजकीय पक्षांचे शक्ती प्रदर्शनही सुरु झाले आहे. निवडणुकांचा बिगुल वाजल्याने स्थानिक राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. निवडणुकांचा काळ अगदीच जवळ आल्याने राजकीय डावपेच आखण्याची स्पर्धा सुरु झाली असून राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष निवडणुकीसाठी आपापली रणनीती आखात असले तरी अनेक युवकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचीही तयारी दर्शविली आहे. नगर पालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यालाही सुरवात झाली आहे. शहरातील विविध प्रभागातील युवकांनी नगर परिषद निवडणूक लढण्याकरिता दंड थोपटल्याने यावेळी नगर पालिकेची निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे भाकीत राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे. राजकीय मात्तबर व प्रस्थापितांपुढे नव्या दमाच्या युवकांनी तगडं आव्हान उभं केल्यास निवडणुकीच्या निकालाचं चित्र वेगळं राहणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागताच स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट उड्या घेणाऱ्यांचीही चांगलीच चर्चा रंगली. राजकीय पदं भोगलेल्या अनेक राजकारण्यांनी आपल्या सोईनुसार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करून घेतला. आजी माजी सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्या पक्षप्रवेशाने राजकारणात मोठी उलथापालथ झाली. भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत व बंडू चांदेकर यांच्यासह दिलीप काकडे (अपक्ष) यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. नंतर पक्षांतर्गत बंडखोरीचे राजकारण उफाळून आले. दरम्यानच्या काळात पक्षांतराला चांगलाच वेग आला.

हवा पाहून दिवा लावणाऱ्यांनी आपल्या स्वभावगुणानुसार पक्ष बदलण्याची परंपरा कायम ठेवली. पक्षांतराचा इतिहास त्यांनी शाबूत ठेवला. पक्ष बदलाची परंपरा कायम ठेवतांना अनेकांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या घेतल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या पक्षांच्या राजकीय प्रवासानंतर येथील नामांकित सुवर्ण व्यापारी विजय चोरडिया यांनी शिवसेना शिंदे गटाची कास धरली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात पद्धशीर प्रवेश करून घेतला. त्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारीही सोपविली. 

वर्चस्व आणि संधी हा या पक्ष प्रवेशामागील उद्देश असल्याची चर्चा नंतर चांगलीच रंगली. मात्र त्यांचे सुपुत्र कुणाल हे भाजपशी एकनिष्ठ राहिले. कुणाल चोरडिया हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. वडिलांच्या पक्ष प्रवेशाने त्यांची चांगलीच कोंडी झाली, पण चहूबाजूंनी ताशेरे ओढण्यात आल्यानंतरही त्यांनी पक्ष सोडला नाही. वडील शिंदे गटात, मुलगा भाजपमध्ये आणि त्यांचा खंदा विश्वासू उबाठा गटात असे अंतर्गत राजकीय समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे "तीन तीगाडा आणि काम बिगाडा" होऊ नये अशी चर्चा शहरात चवीने चघळली जात आहे.

त्याचप्रमाणे पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी रीतसर पक्षप्रवेश करून घेतले. उबाठा आणि भाजपमध्ये पक्ष प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय नगराळे यांच्या सौभाग्यवती डॉ. संचिता नगराळे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेनेकडून त्या नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. शिवसेनेकडे (उबाठा) प्रभागांसाठी उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार असल्याने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून तळ्यात की मळ्यात या गुंताळ्यात हा पक्ष अडकला आहे. राष्ट्रवादीचे दिलीप भोयर हे आमदार संजय देरकर यांचे खास समर्थक असून स्थानिक पातळीवर ते त्यांच्याच समर्थनार्थ प्रचार मोहिमेत उतरतील अशीही चर्चा रंगू लागली आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष स्थानिक पातळीवर एकत्रित लढण्याची शक्यता जवळजवळ धूसर झाली आहे. काँग्रेस मधील अंतर्गत धुसपूस काँग्रेसच्या एकजुटीस बाधक ठरत आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी निवडणुकीच्या तोंडावर नेहमी चव्हाट्यार येत असल्याने ही गटबाजीच काँग्रेसला बॅकफूटवर आणण्यास कारणीभूत ठरत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र काँग्रेसनेही नगर पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते व पदाधिकारी एकजुटीने कार्य करीत असल्याचे दिसत असून काँग्रेसच्या झालेल्या बैठकीतही काँग्रेस नेत्यांची मोठी फळी संजय खाडे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत नगर पालिका निवडणुकीची रणनीती आखण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश सोहळे चांगलेच रंगले. त्यानंतर नगर पालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि राजकारण शिगेला पोहचलं. २ डिसेंबरला वणी नगर पालिकेची निवडणूक होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. वणी नगर पालिका हद्दीत विस्तार होऊन प्रभाग रचनेत वाढ झाल्याने आता नगर पालिकेचे १४ प्रभाग झाले आहेत. नगर पालिकेच्या १ ते १३ या प्रभागातून २ तर प्रभाग क्रमांक १४ मधून ३ उमेदवार नगर पालिकेवर निवडून जाणार आहेत. तसेच नगराध्यक्षाची निवडही थेट जनतेतून होणार आहे. शहरातील ४९ हजार ५७१ मतदार उमेदवाराचं भाग्य ठरवणार आहेत. मतदानासाठी शहरात ६२ मतदार केंद्र राहणार आहेत. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदारांना मतदान करता येणार आहे. 

राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या पक्षांनी मुलाखती घेतल्या. विविध अटी व शर्थी उमेदवारीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असल्या तरी उमेदवारांना निवडून देण्याचे अधिकार केवळ जनतेलाच आहेत. जनताच ठरवेल कोणता उमेदवार आपला प्रतिनिधी म्हणून निवडायचा. जनतेच्या मतातून उमेदवार निवडले जाणार असल्याने जनतेने नंतर पच्छाताप होणार नाही, असे निस्वार्थ व तळमळीने कामे करणारे उमेदवार निवडावे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होतांना दिसत आहे. राजकीय पक्षांकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. भाजप कडून भारती बन्सीलाल सिडाम, शिवसेना (उबाठा) पक्षाकडून डॉ. संचिता विजय नगराळे, काँग्रेस कडून कु. सिमा मनोहरराव कुमरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर इच्छुकांमध्ये विद्या सचिन आत्राम व भारती संतोष पेंदोर यांचे नावही समोर येत आहे. 

वणी नगर पालिकेच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती विजय मिळविला होता. त्यावेळी नगर पालिकेवर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा रोवला होता. नगर पालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष आणि २२ नगरसेवक भाजपचेच निवडून आले होते. मात्र नगर पालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानतर निवडणूका झाल्याच नाही. तब्बल ३ ते ४ वर्षानंतर नगर पालिकेची निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांसह उमेदवारांचाही उत्साह शिगेला पोहचला आहे. मात्र दरम्यानच्या काळात राजकीय घडामोडीत मोठा बदल झाला असून मतदारांचा कौल आता नेमका कोणत्या पक्षाला किंवा उमेदवारांना मिळतो, हे पाहणं उत्सुक्याच ठरणार आहे. अनेक युवक अपक्ष म्हणूनही निवडणूक लढणार असल्याने त्यांचं पक्षांसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे.  

No comments:

Powered by Blogger.