प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी येथील वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेडचे विद्यमान अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्यावर १३ विरुद्ध १ मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आल्याने आशिष खुलसंगे यांची वसंत जिनिंगच्या अध्यक्षपदाची कारकीर्द अखेर संपुष्टात आली. आज १२ नोव्हेंबरला संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. विशेष म्हणजे ३ नोव्हेंबरला वसंत जिनिंगच्या १७ पैकी १३ संचालकांनी उपनिबंधक यांना आशिष खुलसंगे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावासंदर्भात पत्र दिले होते.
वसंत जिनिंग ही शहरातील नामांकित व सहकार क्षेत्रात पुढारलेली संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याने राजकीय क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. ६ नोव्हेंबर २०२२ साली वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीच्या संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत माजी आमदार वामनराव कासावार समर्थित पॅनलचे १५ संचालक निवडून आले होते. त्यानंतर आशिष खुलसंगे यांची वसंत जिनिंगच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र सर्वकाही सुरळीत पार पडल्यानंतर मागील काही दिवसांपासून संचालकांमध्ये आशिष खुलसंगे यांच्याविरुद्ध नाराजीचा सूर उमटताना दिसला. कालांतराने आशिष खुलसंगे यांच्याप्रती संचालकांमध्ये नाराजी वाढत गेली आणि शेवटी संचालकांनी त्यांच्या विरोधात उपनिबंधकांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला.
अशातच आज वसंत जिनिंग येथे पार पडलेल्या विशेष सभेत १३ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव पारित करून उपनिबंधकांकडे पाठविला. उपनिबंधकांनी आशिष खुलसंगे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाला मंजुरी देत नवीन अध्यक्षांची निवड करण्याला मान्यता दिली आहे. या बैठकीत १७ पैकी ३ सदस्य गैरहजर राहिले तर आशिष खुलसंगे यांनी स्वतःच्या बाजूने मतदान केले. १३ संचालकांनी त्यांच्या विरोधात मतदान केल्याने १३ विरुद्ध १ मतांनी त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यामुळे त्यांची वसंत जिनिंगच्या अध्यक्षपदाची कारकीर्द संपुष्टात आली आहे. आशिष खुलसंगे यांच्यावर संचालकांनी अविश्वास आणल्याने राजकारणासह सहकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. आता यानंतर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

No comments: