Latest News

Latest News
Loading...

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई! तडीपार आरोपीसह दोन जणांना घेतले ताब्यात; गुन्हेगारी हालचालींवर पोलिसांची बारीक नजर


प्रशांत चंदनखेडे वणी :-

गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या “ऑल आऊट ऑपरेशन” आणि “हिस्ट्रीशीटर मोहीम” अंतर्गत यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वणी परिसरात दोन संशयित इसमांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यापैकी एकावर तडीपारीचे आदेश लागू असूनही तो प्रतिबंधित क्षेत्रात फिरताना आढळल्याने त्याच्याविरुद्ध कलम १४२ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔹 पहिली कारवाई : दीपक चौपाटी परिसरात संशयास्पद इसम ताब्यात

११ नोव्हेंबरला रात्री स्थानिक गुन्हे शाखा पथक शहरात गस्त घालत असतांना त्यांना दीपक चौपाटी परिसरात एक इसम गुन्हेगारी कारवाई करण्याच्या उद्देशाने अंधारात आपलं अस्तित्व लपवून बसला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या खात्रीशीर माहितीवरून पथकाने शीघ्र वणीतील दीपक चौपाटी परिसरात जाऊन अंधारात संशयास्पदरीत्या लपून बसलेल्या त्या इसमाला ताब्यात घेतले.
रात्री संशयास्पद स्थितीत आढळलेल्या त्या व्यक्तीने पथकाने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्याने पथकाचा त्याच्यावरील संशय आणखीच बळावला. नंतर पथकाने केलेल्या चौकशीत त्याची ओळख गोपी किशन लोणारे (वय ३०, रा. सेवा नगर, वणी) अशी पटली.
त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ प्रमाणे पोलीस स्टेशन वणी येथे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

🔹 दुसरी कारवाई : तडीपार असूनही वणी शहरात फिरणारा आरोपी गजाआड

१२ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला माहिती मिळाली की, साहिल कैलास पुरी (वय २२, रा. सेवा नगर, वणी) हा तडीपार असूनही नेताजी सुभाषचंद्र चौक परिसरात देशी दारू दुकानाजवळ संशयास्पदरीत्या फिरत आहे. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने क्षणाचाही विलंब न करता त्याठिकाणी धाड टाकत आरोपीला ताब्यात घेतले.
सदर आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता उपविभागीय दंडाधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये त्याचा सहा महिन्यांसाठी जिल्हाबाहेर तडीपारीचा आदेश काढला होता.
तरीही तो वणी शहरात फिरतांना दिसून आल्याने त्याच्यावर मपोकाच्या कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

🔹 वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पथकाचे योगदान

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे (वणी) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या आदेशानुसार सपोनि दत्ता पेंडकर, पोहवा सुधीर पांडे, निलेश निमकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी आणि चालक पोना सतीश फुके यांनी केली. पुढील तपास पोलीस स्टेशन वणी मार्फत सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.