Latest News

Latest News
Loading...

वणी–शिंदोला बससेवा पुन्हा सुरू होणार; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना दिलासा

प्रशांत चंदनखेडे वणी : -

वणी ते शिंदोला या मार्गावरील एसटी बससेवा बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि शेतकरी यांचे प्रचंड हाल सुरू होते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अडथळ्यात आला होता, तर नागरिकांना दवाखाना, बाजारहाट व इतर कामांसाठी शहरात ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) उपतालुका प्रमुख लुकेश्वर बोबडे यांनी वणी आगार प्रबंधकांना दिलेल्या निवेदनातून बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.

ही मागणी गांभीर्याने घेत वणी एसटी आगार प्रशासनाने वेगवान हालचाल करीत वणी–शिंदोला मार्गाची पाहणी पूर्ण केली. पाहणीनंतर आगार अधिकाऱ्यांनी सोमवारपासून बससेवा सुरू करण्याचे आश्वासन देत विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे. बस बंद झाल्यामुळे जवळपास १०० विद्यार्थी दररोजच्या शिक्षणासाठी लिफ्ट किंवा खाजगी वाहनांचा आधार घेत होते. शिंदोला, येनक, खांदला, बोरगाव, येनाडी, चनाखा, परमडोह, कुर्ली व चिखली या गावांतील विद्यार्थ्यांचे पास असूनही त्यांना बससुविधा मिळत नव्हती.

बससेवा सुरू करण्यासाठी लुकेश्वर बोबडे यांनी स्थानिक आमदार संजय देरकर व उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्यांनाही निवेदन दिले होते. या पाठपुराव्याला यश मिळताच ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. बससेवा बंद राहिल्यास आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र एसटी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत मागणीची दखल घेतल्याने आता या मार्गावरील प्रवाशांना पुन्हा नियमित बससेवा उपलब्ध होणार आहे.

निवेदन देतेवेळी लुकेश्वर बोबडे यांच्यासह डॉ. जगन जुनगरी, अतिश गौरकार, हेमंत इचोडकर, योगेश थोरक, विकास धगडी, डोमा इचोडकर, दत्ता सोनवणे तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वणी–शिंदोला बससेवा सोमवारपासून पुन्हा रुळावर येणार असल्याची माहिती मिळताच परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.