नगर पालिका निवडणूक महासंग्राम : महाविकास आघाडीत बिघाडी, वंचित व एनसीपीची (शरद पवार गट) चर्चा विस्कटली, आतापर्यंत केवळ पाच उमेदवारी अर्ज दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी नगर पालिकेची दीर्घ काळापासून रखडलेली निवडणूक होऊ घातल्याने राजकारण शिगेला पोहचलं असून राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. कडाक्याच्या थंडीतही राजकारण तापलं आहे. येत्या २ डिसेंबरला वणी नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी व निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १८ नोव्हेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून २५ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. नगर पालिकेच्या १४ प्रभागातून २९ नगरसेवक नगर पालिकेवर निवडून जाणार आहेत. तसेच नगराध्यक्षाची निवडही थेट जनतेतून होणार आहे. शहरातील ४९ हजार ५१७ मतदार उमेदवाराचं भाग्य ठरविणार आहेत.
नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असून प्रभागातील आरक्षणातही २९ पैकी १५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे यावेळी नगर पालिकेवर महिलाराज येणार आहे. तसेच प्रभागातील उर्वरित १४ जागा विविध प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असून त्या जागांवर देखील पुरुष उमेदवारांसह महिला उमेदवारही निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे महिलांना आरक्षित जागांसह प्रभागातील इतर प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी राखीव असलेल्या १४ जागांवरही निवडणूक लढता येणार आहे. निवडणुकीसाठी ६२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने तगडा बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं असून तशी तयारीही प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये वणी नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नगर पालिकेची निवडणूक ही झालीच नाही. त्यानंतर नगर पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. नगर पालिकेवर दीर्घकाळ प्रशासकराज राहिलं. प्रशासकाच्या देखरेखीत नगर पालिकेचे कामकाज सुरु होते. मात्र दीर्घ काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित असल्याने न्यायालयाने मार्च २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिले. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने वेगवान हालचाली करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. आणि त्यानंतर लगेचच नगर पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नगर पालिका निवडणुकीची तारीख जाहीर होताच राजकीय हालचालीही तीव्र झाल्या. राजकीय पक्षांच्या नियोजन सभा सुरु झाल्या. कार्यकर्ते मेळावे घेण्यात आले. संघटन बांधणीला वेग आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटित करण्याकरिता पक्षांची धावपळ सुरु झाली.
त्यातच गाव शहरातील कार्यकर्त्यांचा आपापल्या पक्षात प्रवेश करून घेण्याचीही स्पर्धा वाढली. दरम्यानच्या काळात राजकीय पक्षांचे पक्षप्रवेश सोहळे चांगलेच रंगले. अनेकांनी या काळात आपापल्या सोईनुसार पक्षप्रवेश करून घेतले. राजकीय पक्षात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अनेकांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या घेतल्या. हवा पाहून दिवा लावणाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून आपली उमेदवारी पक्की करून घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर अध्यक्ष पदावरील नियुक्ती पासून राजकारणाची पायरी चढणाऱ्या अंकुश बोढेने अल्पावधीतच राजकारणात उंच उडी घेत वेगवान राजकीय प्रवास सुरु केला. अंकुशची राजकारणातील स्पीड पाहून राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या राजकारण्यांच्याही भुवया उंचावल्या. अंकुश बोढे आता भाजपच्या छत्रछायेत गेला असून त्याला भाजपने जिल्हा उपाध्यक्षपद बहाल केलं आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी उत्साही असलेल्या अंकुश बोढेला आता नगर सेवकांच्या लढतीत उतरावे लागले आहे.
नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरवेळी राजकीय समीकरण बदलतांना पाहायला मिळत आहे. राजकीय घडामोडीत कोणता ना कोणता ट्विस्ट येत असल्याने पक्षाचे कार्यकर्ते व मतदारही चांगलेच गोंधळात सापडले आहेत. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. जागा वाटपाचा तिढा कायम राहिल्याने वंचित बहुजन आघाडीसह राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार गट) महाविकास आघाडीतून काढता पाय घेत "एकला चलोचा" नारा दिला आहे. उबाठा व काँग्रेस मधील जागा वाटपाची चर्चाही अजून पूर्णत्वास पोहचली नाही. त्यामुळे त्यांच्यातही जागा वाटपावरून मतभेद सुरु आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष व मित्र पक्षांमध्ये जागा वाटपावरून समन्वय साधला जात नसल्याने महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळातच अडकली आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचे प्रभागातील उमेदवारही अजून निश्चित झालेले नाही. तसेच महायुती कडूनही अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. १५ नोव्हेंबर पर्यंत एक नगराध्यक्षासाठी तर चार नगर नगरसेवकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये डॉ. संचिता विजय नगराळे यांचा नगराध्यक्षासाठी तर प्रकाश पिंपळकर, किरण तेलतुंबडे, निखिल ढुरके, जोत्सना धोटे यांचे नगरसेवकासाठी अर्ज दाखल झाले आहेत. पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होत असलेला विलंब शहरवासीयांची उत्सुकता वाढवू लागला आहे. त्यातच अपक्ष निवडणूक लढविणारेही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे १६ व १७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रचंड गर्दी उसळणार असल्याचे बोलले जात आहे.

No comments: