साखरा रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी, तस्करांनी वेकोलि हद्दीत केलेल्या रेती साठ्यावर महसूल पथकाची धडक कार्यवाही
प्रशांत चंदनखेडे वणी :-
अधिकृतपणे रेतीघाट सुरु झालेले नसतांनाही रेती घाटांवर मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु असून रेती घटांवरून रात्री रेती भरलेली वाहने बिनधास्त निघत आहेत. रेती घाटांवरून सर्रास रेतीची चोरी होत असतांना प्रशासन मात्र तस्करांवर कार्यावाहीचा बडगा उगारतांना दिसत नाही. त्यामुळे वाळू तस्करांचं धाडस प्रचंड वाढलं आहे. वाळू तस्करांची मुजोरी व शिरजोरी प्रचंड वाढली असून महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही ते जुमानतांना दिसत नाही. तालुक्यातील साखरा रेती घाटावरून रेतीचा बेसुमार उपसा करून वेकोलि हद्दीत रेतीचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता. याबाबत आंबेडकरी जन आंदोलन समितीचे अनिल तेलंग यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी यांनी कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर महसूल पथकाने धाड टाकून महालक्ष्मी कॅम्पच्या मागे असलेला २० ते ३० ट्रॅक्टर रेतीचा साठा सील केला आहे. ही धडक कार्यवाही १८ नोव्हेंबरला करण्यात आली.
वाळू माफियांनी वाळू चोरीचा अगदीच सपाटा लावला आहे. रेती घाटांवरून बेकायदेशीरपणे रेतीचा उपसा करून रेती सर्रास काळ्या बाजारात विकली जात आहे. नदी व नाल्यांचे पात्र पोखरून रेती चोरी केली जात आहे. रेती घाटांवरून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असतांना तस्करांवर महसूल विभाग कार्यावाहीचा बडगा उगारतांना दिसत नाही. तालुक्यातील साखरा रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वेकोलि हद्दीतील महालक्ष्मी कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करण्यात आला. नंतर ही अवैधरित्या साठवून ठेवलेली रेती ट्रॅक्टरच्या माध्यमातून काळ्या बाजारात विक्री केली जाणार होती. मात्र आंबेडकरी जन आंदोलन समितीचे अनिल तेलंग यांना रेती तस्करांनी २० ते ३० ट्रॅक्टर अवैध रेतीचा साठा केल्याचे निदर्शनास येताच त्यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन महसूल कर्मचाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले. त्यावरून महसूल पथकाने धाड टाकून महालक्ष्मी कॅम्प जवळ करण्यात आलेला अवैध रेती साठा सील केला. ही कार्यवाही मंडळ अधिकारी राठोड व तलाठी अंकुश गजभिये यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कार्यवाहीने रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. महसूल पथकाने अवैध रेती साठा सील केल्यानंतर पंचनामा करून महसूल अधिकाऱ्यांच्या परवानगीने हा रेती साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर जप्त केलेली रेती घरकुलधारकांना वाटप करण्यात आली. महसूल विभागाच्या या कार्यवाहीमुळे घरकुलधारकांना रेती मिळाल्याने त्यांच्या मधून समाधान व्यक्त होतांना दिसत आहे.

No comments: