वणी नगर पालिका निवडणूक महासंग्राम: उमेदवार मतदारांच्या दारी, भाजपची प्रचारात आघाडी तर महाविकास आघाडीचा प्रचार संथ
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी नगर पालिकेच्या २ डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. आपापल्या पक्षांचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्याकरिता पक्षांनी रणनीती व डावपेच आखणेही सुरू केले आहे. प्रभागांमध्ये प्रचारसभा घेतल्या जात असून मतदारांच्या घरोघरी जाऊनही उमेदवार आपापला प्रचार करू लागले आहेत. थेट मतदारांपर्यंत पोहचून मतदारांचा कौल मिळविण्याचा सर्वोतपरी प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जात आहे. प्रत्येकच राजकीय पक्षांचे उमेदवार मतांसाठी मतदारांच्या दारापर्यंत पोहचू लागल्याने दररोज वेगवेगळ्या राजकीय पाहुण्यांच्या घरी येण्याने नागरिकही भारावून जाऊ लागले आहेत. नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागात उमेदवारांची रेलचेल पाहायला मिळत असल्याने उमेदवारी प्रचारामुळे शहर गजबजून उठलं आहे. अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळायचं असलं तरी त्यांनीही मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. २१ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून यानंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतात, हे स्पष्ट होणार आहे.
वणी नगर पालिकेच्या निवडणूकीला जेमतेम ११ दिवस शिल्लक राहिल्याने कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून नगर पालिका निवडणुकीत विजय संपादन करण्याच्या उद्देशाकडे शहरातील राजकारण वळलं आहे. उमेदवार मतदारांच्या घरभेटी घेत आहेत. आपापल्या पद्धतीने मतदारांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रभागाचे प्रतिनिधी म्हणून आपण किती सक्षमतेने कामे करू शकतो, हे मतदारांना ठासवून सांगत आहेत.
नगर पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर कधी प्रभागात न फिरकलेले माजी नगर सेवकही आता मतांसाठी दारोदारी फिरतांना दिसत आहेत. कधी प्रभागातील समस्या व लोकांचे प्रश्न जाऊन न घेणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांनाही आता जनतेचा पुळका आला आहे. विकासकामांना प्राधान्य देण्याची ग्वाही देऊन ते मतदारांना मत मागत आहेत. मात्र शहराच्या विकासाचं पर्व व विकासकामांना नवसंजीवनी मिळाल्याचा बोध नागरिक घेऊन आहेत. शहराच्या विकासाची वाटचाल शहरवासीयांच्या चांगलीच लक्षात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांकडून मिळणाऱ्या आश्वासनांचा प्रभाव मतदारांवर कितपत पडतो, यावर आता सुज्ञ नागरिकांच्या चर्चा रंगल्या आहेत.
कार्यकर्त्यांचं संघटन, बूथपर्यंतचं नियोजन आणि उमेदवारांच्या प्रचाराचं योग्य आकलन यावर विजयाची भिस्त अवलंबून राहणार आहे. राजकीय पक्ष यावर जोर देत असले तरी भाजपचं सध्या या तीनही आघाड्यांवर प्राबल्य दिसून येत आहे. भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक प्रभागात होणाऱ्या प्रचारसभा, प्रचाराची नियोजनबद्ध आखणी आणि उमेदवारांच्या प्रचाराचा आराखडा यावरून भाजपने मतदारांपर्यंत पोहोचण्यात सरशी साधल्याचे दिसत आहे. शहरातील विकासाच्या अजेंड्यावर उमेदवारांच्या प्रचाराची शहर भाजप कडून धुरा वाहिली जात आहे. पक्षाच्या धेय्य धोरणानुसार उमेदवारांचा नियोजनबद्ध प्रचार केला जात आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शहरध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांच्या नेतृत्वात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारांच्या प्रचाराला जोमाने भिडले आहेत.
परंतु महाविकास आघाडी कडून मात्र उमेदवारांच्या प्रचाराला वेग आल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीत अंतर्गत नाराजी व धुसपूस अजूनही सुरूच असल्याचे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजेनाम्यांवरुन दिसून येते. कार्यकर्तेही अजून जोमाने निवडणुकीच्या कामाला लागल्याचे दिसून येत नाही. पक्ष नियोजनाचा महाविकास आघाडीत दिसून येत असलेला अभाव कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह निर्माण करण्यास कारणीभूत ठरू लागला आहे. भाजप व महाविकास आघाडीत थेट लढत होणार असल्याचे जाणकारांचे मत असले तरी सध्या तरी प्रचारात भाजपने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

No comments: