Latest News

Latest News
Loading...

एक नगराध्यक्ष तर सात नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी घेतले नामांकन अर्ज मागे


प्रशांत चंदनखेडे वणी :-

नगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवार २१ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी तर एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी १५३ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. १५३ उमेदवारांमधून २९ उमेदवार हे नगरसेवक म्हणून नगर पालिकेवर निवडून जाणार आहेत. तर ७ उमेदवारांपैकी एक महिला नगराध्यक्ष बनणार आहे. शहरातील ४९ हजार ५१७ मतदार आता या उमेदवाराचं भाग्य ठराविणार आहेत. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदासाठी २०१ तर नगराध्यक्ष पदासाठी १० अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर छाननी दरम्यान नगरसेवक पदासाठी १६० तर नगराध्यक्ष पदासाठी ८ अर्ज वैध ठरले होते. आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज केलेल्या उमा विठ्ठलराव राजगडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला होता. तर नगरसेवक पदासाठी अर्ज केलेल्या भारत शंकर कुंभारे(प्रभाग ९ ब), सतिश नामदेव इचवे(प्रभाग ९ ब), निखिल प्रभाकर डवरे(प्रभाग ८ ब), माधुरी किरण तेलतुंबडे(प्रभाग ४ अ), अनिल नानाजी ताजने(प्रभाग ४ ब), वंदना महेश पारखी(प्रभाग १४ अ) व धीरज गणेश भोयर(प्रभाग ४ ब) यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले आहेत. एकूण आठ उमेदवारांनी आज आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) विजय नगराळे यांच्या अर्धांगिनी डॉ. संचिता विजय नगराळे या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पती विजय नगराळे यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र केला. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या लढतीत विद्या खेमराज आत्राम (भाजप), पायल यशवंत तोडसाम (शिवसेना शिंदे गट), शेख काजल इस्माईल अखतर (राष्ट्रवादी शरद पवार गट), पुष्पा पुंडलिक आत्राम (वंचित बहुजन आघाडी), पुष्पा कवडू कुळसंगे (आम आदमी पार्टी), भारती संतोष पेंदोर (अपक्ष) हे उमेदवार देखील दंड थोपटून आहेत. भाजप व महाविकास आघाडीत थेट लढत असली तरी शिवसेना शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. नगरसेवक पदासाठी तब्बल १५३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. 

No comments:

Powered by Blogger.