समविचारी पक्षांसाठी चर्चेचे दार खुले, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वंचित स्वबळावर लढेल
प्रशांत चंदनखेडे वणी :-
भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्र पक्षांशी गटबंधन वगळता काँग्रेस किंवा समविचारी पक्षांसाठी चर्चेची दारे खुली असून, सध्या तरी युती करण्यासंदर्भात कोणत्याही पक्षासोबत तशी अधिकृत चर्चा झालेली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागली असून वणी नगर परिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडी भक्कमपणे व पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत वंचितचे वणी विधानसभा प्रमुख राजेंद्र निमसटकर यांनी दिले आहे. नगराध्यक्षांपासून तर शहरातील सर्व प्रभागात सक्षम व प्रबळ उमेदवार उभे केले जाणार असून तशी वंचितशी एकनिष्ठ आणि राजकीय व सामाजिक वलय असलेल्या उमेदवारांची यादीही वंचितने तयार केली असल्याचे राजेंद्र निमसटकर यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करतांना राजू निमसटकर हे पुढे म्हणाले की, जागावाटपासंदर्भात अद्याप कोणत्याही पक्षासोबत अधिकृत चर्चा झाली नसल्याने वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी कंबर कसली असून तशी रणनीतीही आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित जोरदार पुनरागमन करणार असून वंचितच्या विचारधारेकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्याकरिता वंचित निर्णायक भूमिका घेणार असून तशी व्युव्हरचना देखील पक्ष संघटनेने आखली आहे.
वंचितांची मोट बांधून त्यांना प्रतिनिधित्वाची संधी देणारा हा पक्ष असून समतेच्या धेय्य धोरणांवर पक्षाची वाटचाल सुरु आहे. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध लढणारा हा पक्ष आहे. तळागाळातल्या लोकांसाठी झटणारा हा पक्ष असल्याने या पक्षाशी जनतेचा विश्वास जुळला आहे. वंचितचा मतदार हा एकनिष्ठ असून वंचितकडे वाढत असलेला लोकांचा कल बघता नगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वंचित निश्चितपणे मुसंडी मारेल, यात दुमत नाही.
वंचितांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा वंचितचा अजेंडा राहिला आहे. तळागाळातल्या लोकांना वंचितने उमेदवारी दिली आहे. लोकभावनेची जाण ठेवणारे लोकप्रतिनिधी जोपर्यंत सत्तेत येणार नाही, तोपर्यंत चित्र पालटणार नाही. द्वेषाच्या राजकारणाला थांबवायचे असेल तर समतावादी विचार जोपासणाऱ्यांना पुढे यावे लागेल. लोकांचा विचार करणारे लोकप्रतिनिधी जोपर्यंत लोकांना मिळणार नाही, तोपर्यंत लोकांची फरफट थांबणार नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सक्षम व जाणते उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याकरिता वंचितने रणांगण पेटविण्याची पूर्ण तयारी केली असल्याचे यावेळी राजू निमसटकर यांनी ठळकपणे सांगितले.
पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील यांच्यासह मंगल तेलंग, वैशाली गायकवाड, डॉ.प्रशिक बरडे, आशिष पाझारे, ऍड.चंदू भगत, ज्ञानेश्वर मुन, अर्चना नगराळे, किशोर मुन, डॉ.आनंद वेले, मिलींद नगराळे, नंदिनी ठमके, प्रणिता ठमके, निळावती मुन, सुवर्णा नंराजे, मीना दिघाडे,अंकित पाझारे, बंटी तामगाडगे, ऍड. तामेश्वर लोणारे, राहुल नगराळे, गोविंदा दुर्गे, शंकर रामटेके, भारत कुमरे, सतीश गेडाम, आकाश दुपारे, अमोल दुपारे यांच्यासह वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments: