Latest News

Latest News
Loading...

तालुक्यातील सावंगी (जुनी) येथे तीन दिवसीय भव्य जगदंबा माऊली महोत्सव संपन्न

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील सावंगी (जुनी) येथे जगदंबा माऊली महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. जगदंबा माऊली देवस्थान व ग्रामवासियांच्या वतीने आयोजित हा तीन दिवसीय महोत्सव उत्साहात पार पडला. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या महोत्सवात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. या महोत्सवानिमित्त दुरदुरून भाविक जगदंबा मातेच्या दर्शकरिता आले होते. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात गावात उत्साह व आनंदाचं वातावरण होतं. एखाद्या सणासारखं गाव उजळलं होतं. गावकऱ्यांनी एकोप्याने हा जगदंबा माऊली महोत्सव साजरा केला. 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावंगी (जुनी) या गावात जगदंबा माऊली महोत्सव भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला. गावकऱ्यांनी उत्साहाच्या वातावरणात हा महोत्सव साजरा केला. गावात जगदंबा मातेचं जागृत देवस्थान असून भाविक याठिकाणी दुरदुरून दर्शनाला येतात. आदर्श गाव असलेल्या सावंगी (जुनी) या गावात एकोपा असून सर्व समाजाचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. सावंगी (जुनी) येथे दरवर्षी जगदंबा माता महोत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील या महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. वेगवेगळ्या गावातील भजन मंडळ या महोत्सवात सहभागी झाले होते. भजनातून भक्तिमय झालेल्या वातावरणात नंतर भव्य ग्रामदिंडी काढण्यात आली. गावकऱ्यांनी स्वतः राबून गावाची साफसफाई केली. महापूजा व शेवटच्या दिवशी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान भंजन मंडळी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा या महोत्सवात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

जगदंबा माता महोत्सवाची गावात आगळीवेगळी परंपरा आहे. आणि ती अनेक वर्षांपासून चालत आली असून आजही ती तेवढ्याच श्रद्धेने जोपासली जाते. जगदंबा माऊली महोत्सवाला माहेरवाशिनी माहेरी परतात व या महोत्सवात सहभागी होतात. तसेच बाहेरगावी वास्तव्यास असलेले या गावातील लोकही महोत्सवाच्या निमित्ताने गावी परतात व एकत्र येतात. परगावी असणारा गावातील प्रत्येक माणूस या महोत्सवानिमित्त गावी परततो आणि मातेचं दर्शन घेतो. जगदंबा मातेची मनोभावे सेवा करतो. या महोत्सवासाठी गावातील प्रत्येक माणूस दिवसरात्र राबतो. आणि हा महोत्सव यशस्वीपणे पार पाडतो. शिस्तबद्धपणा आणि उत्तम नियोजन ही या महोत्सवाची खास ओळख आहे. माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाची काल ३ नोव्हेंबरला यशस्वी सांगता झाली. 


No comments:

Powered by Blogger.