प्रशांत चंदनखेडे वणी :-
निर्गुडा नदीच्या काठावर गांजाचे झुरके मारत बसलेल्या तीन गंजेड्यांना वणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशान्वये हाती घेण्यात आलेल्या मादक पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पोलिस उपनिरीक्षक धिरज गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफ गस्तीवर असताना गोपनीय माहितीच्या आधारे गंगाविहार परिसरात निर्गुडा नदीकाठी छापा मारण्यात आला. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत पाहणी केली असता तीन तरुण चिलममध्ये गांजा भरून धुराचे झुरके ओढताना आढळले.
या तिन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी प्रज्योत सुभाष दखणे (२५) रा. टागोर चौक, नितेश सुरेश माळीकर (२४) रा. संताजी शाळेजवळ, सचिन विनोद घनकसार (२४) रा. रंगारीपुरा, वणी अशी सांगितली.
सदर तरुणांच्या अंगझडतीदरम्यान वापरलेली चिलम, आगपेटी व जळलेल्या काड्या असा पुरावा जप्त करण्यात आला. तिन्ही आरोपींनी पंचासमक्ष गांजा सेवन केल्याची कबुली दिल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले असून, त्यांच्यावर कलम ८(क) सह कलम २७, NDPS कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, वणी शहरात तरुणाईमध्ये गांजाच्या सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, या नशेतून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागल्याने नागरिक कमालीचे काळजीत आले आहेत. तरुणांमध्ये वाढत असलेलं हे नशेचं प्रमाण रोखण्याकरिता पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या या मोहिमेमुळे शहरातील ‘गांजा गटांचे’ धाबे दणाणले आहेत.
पोलीसांचे आवाहन :
शहरात मादक पदार्थांच्या सेवन, विक्री किंवा साठा बाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी नागरिकांना केले आहे.

No comments: