गावातील विकासकामे निकृष्ट होत असल्याची गोवारी (पाथरी) वासियांची ओरड, ऑरो प्लांटही उभारला जात आहे गावाच्या वेशीवर
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोवारी (पारडी) ग्रामपंचायती अंतर्गत गावात करण्यात येत असलेली विकासकामे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याची ओरड गावकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. गावात काही दिवसांपूर्वी बांधण्यात आलेल्या भूमिगत नालीचे बांधकाम देखील निकृष्ट झाल्याच्या तक्रारी गावातून होऊ लागल्या आहेत. तसेच गावात उभारण्यात येत असलेला ऑरो प्लांट गावाच्या वेशीवर उभारला जात असल्याने गावकऱ्यांमधून कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
गोवारी (पारडी) या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असलेली विकासकामे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी गावातून ऐकायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गावात भूमिगत नालीचे बांधकाम करण्यात आले. नाली बांधण्याकरिता खोदकाम केलेल्या ठिकाणी थातुर मातुर बेड-काँक्रीट टाकण्यात आले. त्यानंतर सिमेंट पाईप टाकून खोदकामातून निघालेल्या मातीने पाईप बुजविण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भूमिगत नालीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहे.
खोदकाम केलेल्या ठिकाणी सिमेंट पाईप टाकतांना आधी नियमानुसार बेड-काँक्रीट टाकणे गरजेचे असते. मात्र थातुर मातुर बेड-काँक्रीट टाकून नालीचे बांधकाम करण्यात आल्याने ही नाली दीर्घकाळ टिकेल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. तसेच ही नाली आधी ज्याठिकाणी मंजूर करण्यात आली होती, तो मार्ग गावातीलच एका प्रशासकीय सेवेतील व्यक्तीच्या मर्जीनुसार पद्धशीरपणे दुसरीकडे वळविण्यात आल्याचीही चर्चा गावात रंगली आहे. टक्केवारीतून अतिशय निकृष्ट दर्जाची कामे केल्या जात असल्याने जनतेच्या पैशाची निव्वळ उधळण होत असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया गावकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
तसेच गावकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून गावात ऑरो प्लांट उभारला जात आहे. परंतु अगदी गावाच्या वेशीवर ऑरो प्लांट उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. हा ऑरो प्लांट गावाबाहेर उभारला जात असून याठिकाणी घाणीचे साम्रज्य पसरले आहे. ऑरो प्लांट उभारण्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी नागरिक केरकचरा, टाकाऊ वस्तू व शेणखत साठवून ठेवतात. घाण कचरा असलेल्या ठिकाणी हा स्वच्छ पाणीपुरवठ्याचा ऑरो प्लांट उभारला जात आहे. ग्रामपंचायतीच्या या अनागोंदी कारभारामुळे गावकऱ्यांमधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

No comments: