Latest News

Latest News
Loading...

आठ दिवसांत भालर येथे दुसरी आत्महत्या, शेतकरी संजय लाडे यांनी शेतातच घेतला विषाचा घोट


प्रशांत चंदनखेडे वणी :-

मानसिक व आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत. सततची नापिकी व यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी प्रचंड नैराश्येत आला आहे. आणि यातूनच तो टोकाचा मार्ग निवडू लागला आहे. भालर येथील महिलेने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच काल आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळल्याने समाजमन हेलावलं आहे. भालर येथील शेतकरी संजय भावराव लाडे वय अंदाजे ४९ वर्षे यांनी शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ७ नोव्हेंबरला रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. 

वणी तालुक्यातील भालर येथे कुटुंबासह राहत असलेले संजय लाडे हे नेहमी प्रमाणे ७ नोव्हेंबरला शेतात गेले होते. मात्र बराच उशीर होऊनही ते घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने शेतात जाऊन बघितले असता त्याला वडील निपचित पडून दिसले. तसेच वडिलांनी विष प्राशन केल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने एकच हंबरडा फोडला. नंतर त्याने ही माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 

२ नोव्हेंबरला भालर येथीलच एका महिलेने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच येथीलच संजय लाडे या शेतकऱ्याने विषाचा घोट घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने समाजमन हळहळलं आहे. संजय लाडे यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप पुढे आलं नसलं तरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. संजय लाडे यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.