Latest News

Latest News
Loading...

नगर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता! उपाध्यक्ष पदावर कुणाची लागणार वर्णी, स्वीकृत सदस्याच्या निवडीवरही लागले लक्ष


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी नगर पालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागेल, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच स्वीकृत सदस्यपदी कुणाची निवड होईल, याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्याचप्रमाणे विषय समित्यांचं सभापती पद कुणाच्या वाट्याला जाईल, याकडे नवनिर्वाचित नगरसेवकांचं लक्ष लागलं आहे. नगर पालिकेत २९ पैकी १८ नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे असून नगराध्यक्ष देखील भाजपचाच असल्याने नगर पालिकेत भाजप स्पष्ट बहुमतात आहे. त्यामुळे उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापती पदांवर भाजपच्याच नगरसेवकांची वर्णी लागणार असली तरी कुणाच्या गळ्यात उपाध्यक्ष व सभापती पदांची माळ पडते, याची उत्सुकता आता सध्या शिगेला पोहचली आहे. त्यामुळे विषय समित्यांचं सभापती पद वाटप करतांना समतोल राखण्याचं आव्हानही पक्ष नेतृत्वासमोर उभं राहणार आहे. 

भारतीय जनता पक्षाने नगर पालिका निवडणुकीत बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी दिली. नगराध्यक्ष पदाचा चेहराही सुशिक्षित व स्वच्छ प्रतिमेचा निवडला. त्यातच नियोजनबद्ध व धडाकेबाज प्रचारही केला. विकासाच्या अजेंड्यावर प्रचाराची धुरा वाहण्यात आली. भाजपच्या सर्व नेते मंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही प्रचाराची जवाबदारी समर्थपणे पार पाडली. उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण शहर पिंजून काढण्यात आलं. मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी देण्यात आल्या. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शहर अध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

याचेच फलित म्हणून भाजपला नगर पालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. शहराच्या विकासाचा आलेख बघता मतदारांनी परत एकदा भाजप नेतृत्वावर विश्वास दाखविला. भाजपने बहुतांश नवीन व नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी दिल्याने मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपचे १८ नगरसेवक निवडून दिले. तसेच नगराध्यक्ष पदही भाजपच्याच पदरात टाकले. विद्या खेमराज आत्राम यांना भरगोस मतांनी विजयी करून त्यांना नगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळवून दिला. त्यामुळे नगर पालिकेत नगराध्यक्ष व १८ नगरसेवक असं भाजपचं मोठं संख्याबळ आहे.

त्यातच अपक्ष नगरसेवक भाजपला विनाशर्त पाठिंबा जाहीर करू लागले आहेत. पण सध्या भाजपने पाठिंब्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले असून प्रभागाच्या विकासात सोबत राहणाऱ्या नगरसेवकांचं मात्र स्वागत असेल, अशी सकारात्मक भूमिका माजी आमदारांनी मांडली आहे. अशातच आणखी दोन नगरसेवक भाजपाला पाठिंबा देण्याच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचाही लवकरच खुलासा होणार आहे. 

असे असले तरी उपाध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागेल, याचे सर्वांनाच वेध लागले आहे. उपाध्यक्ष पदासाठी दोन नावे प्रकर्षाने समोर येत आहेत. त्यापैकी कुणाच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एक सदस्य संयम ठेऊन आहे तर दुसरा उत्साहाने कामाला देखील लागला आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व कुणाला संधी देतो, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

भाजपने विकासाला गती देण्याचे आपले इरादे स्पष्ट केले असून विकासकामांचा आरखडा तयार केला जात आहे. नगर पालिकेत सत्ता येताच मागणी असलेल्या ठिकाणी बोअरवेल कामाचा नारळ फोडून भाजपने विकासकामांना गती देण्याचं आपलं व्हिजन स्पष्ट केलं आहे. नगर पालिका निवडणुकीत शिंदे गटाचं नेतृत्व करणाऱ्या विजय चोरडिया यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला असून ते एकही नगरसेवक निवडून आणू न शकल्याने शिंदे गटाचा सुपडा साफ झाला आहे. महाविकास आघाडीचे ९ नगरसेवक निवडून आले. तर दोन जागा अपक्षांनी काबीज केल्या आहेत. भाजपने १८ नगरसेवक निवडून आणत नगर पालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे आता उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य आणि विषय समिती सभापती पदांवर कुणाची वर्णी लागेल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

No comments:

Powered by Blogger.