Latest News

Latest News
Loading...

आंतरराज्यीय गुटखा तस्करीवर एलसीबीची मोठी कारवाई, ६५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन तस्कर ताब्यात


प्रशांत चंदनखेडे वणी :-

जिल्ह्यात वाढत चाललेल्या गुटखा तस्करीला आळा घालण्यासाठी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धडक कारवाई करत आंतरराज्यीय गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेला सुगंधित पानमसाला व तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सुगंधित तंबाखू व गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे विशेष आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुटखा तस्करीकडे आपले लक्ष केंद्रित केले. आपल्या खास खबऱ्यांना अलर्ट करून एलसीबी पथक गुटखा तस्करीवर बारीक लक्ष ठेऊन असतांना पथकाला २७ डिसेंबरला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून पांढरकवडा मार्गे एका आयशर वाहनातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय व खात्रीदायक माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने महामार्ग ४४ वरील ढोकी गावापुढे सापळा रचून पांढरकवडाकडे येणाऱ्या संशयित आयशर (क्रमांक UP-94-AT-2305) वाहनाला थांबविले. पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सागर पानमसाला व सुगंधित तंबाखूचे (SR-1) एकूण १८० पोते आढळून आले. आयशर वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू व मानमसाल्याची तस्करी करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एलसीबी पथकाने वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईत पथकाने ४५,९२,००० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व पानमसाला, एक मोबाईल (६,०००) व आयशर वाहन (२०,००,०००) असा एकूण ६५,९८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुगंधित तंबाखू व गुटखा तस्करीवरील अलीकडच्या काळातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.

या प्रकरणी वाहनचालक मोहन सियाराम यादव (वय २६, रा. पिचोड, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश) व क्लिनर बुध्दा बाबुसिंग परीयार (वय ३५, रा. अमोला थाना, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश) या दोन तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्था.गु.शा. यवतमाळ) यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोउपनि. धनराज हाके, गजानन राजामलु, पोहवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, पोशि. सलमान शेख, चापोहवा नरेश राऊत यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आला आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून, यापुढेही गुटखा तस्करांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गुटखा तस्करीवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोलिस प्रशासन यापुढे सतर्कता बाळगणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

No comments:

Powered by Blogger.