प्रशांत चंदनखेडे वणी :-
मारेगाव तालुक्यातील चोपन येथे शेतात जाण्या-येण्याच्या जुन्या वादातून लग्न समारंभादरम्यान तिघांनी मिळून एका व्यक्तीवर हल्ला चढविल्याची घटना घडली असून, या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निलेश अन्नाजी काथवडे (वय ३७, रा. चोपन, ता. मारेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, २६ डिसेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास चोपन येथील गंगाराम मंदिर परिसरात सुरू असलेल्या लग्न समारंभात ही घटना घडली.
फिर्यादी निलेश काथवडे हे लग्नात जेवण करत असताना, त्यांच्या शेजारी राहणारे नागोराव रामचंद्र दुमने (वय ४५), आशिष नागोराव दुमने (वय २५) व अमोल नागोराव दुमने (वय २७) हे तिघे तेथे आले. कोणतेही कारण नसताना आशिष व अमोल यांनी निलेश काथवडे यांना हाताबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान नागोराव दुमने हा घरी गेला व कांदे कापण्याचा चाकू घेऊन आला. तसेच चाकू फिर्यादीच्या डोक्यावर मारून त्यांना जखमी केले.
आरोपी पतीला मारहाण करीत असताना पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी नागोराव याने तिलाही धक्काबुक्की करून बाजूला ढकलल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नंतर लग्न समारंभात उपस्थित असलेल्या नागरिक व नातेवाईकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले आणि आरोपी घटनास्थळावरून निघून गेले.
या घटनेत फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाली असून, वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील एएसआय दिगंबर किनाके हे करीत आहेत.

No comments: