रेल्वे सायडिंग कामावरून वाद; वाहनाची तोडफोड करत ठेकेदारावर चढवला हल्ला, शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यातील मुंगोली गावाजवळ सुरू असलेल्या रेल्वे सायडिंगच्या कामावरून झालेल्या वादातून काही इसमांनी रेल्वे कंत्राटदाराच्या वाहनाची तोडफोड करत त्याच्यावर लाकडी दांड्याने हल्ला चढविल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पवन यानेश्वर मोहरकर (वय ३४, रा. फ्रेंड्स कॉलनी, नागपूर; सध्या मुक्काम साखरा, ता. वणी) हे मुंगोली गावाजवळील धोपटे ट्रेडर्स या कंपनीमार्फत रेल्वेचे बांधकाम व सायडिंगचे काम करीत आहेत. गेल्या महिन्याभरापासून हे काम सुरू असून दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी २.११ वाजताच्या सुमारास काम सुरू असताना ३ ते ४ अनोळखी इसम तेथे आले. यावेळी कामाच्या ठिकाणी चोरी करू नये, कामाच्या हद्दीबाहेर राहावे, असे सांगितल्याचा राग धरून संबंधित इसमांनी शिवीगाळ व धमकी देत तेथून काढता पाय घेतला.
यानंतर सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास साखरा येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीजवळ असलेल्या खोलीसमोर पवन मोहरकर हे आपल्या मित्रांसह कारमध्ये बसले असताना, त्याच इसमांनी मोठ्याने शिवीगाळ सुरू केली. काही क्षणातच त्यांनी कारजवळ येत कारची काच फोडली तसेच हेडलाईट असेंब्लीचे नुकसान केले.
यानंतर कारमधून बाहेर उतरल्यावर राजन्ना, सद्दाम, दानीश व शाहरुख कुरेशी (सर्व रा. घुग्गुस, ता. जि. चंद्रपूर) यांनी पवन मोहरकर यांना लाकडी दांड्याने गालावर व डोक्यावर मारहाण केली. तसेच “तुला जिवंत सोडणार नाही, गाडी जाळून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर पवन मोहरकर यांनी आपले भाऊ प्रणय धोपटे यांच्यासह शिरपूर पोलिस ठाण्यात येऊन आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या जबानी तक्रारीवरून चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.

No comments: