प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात वीज चोरीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी महावितरणच्या विद्युत भरारी पथकाने सखोल मीटर तपासणी मोहीम राबवली असून, या तपासणीत घरगुती वीजपुरवठ्यात मीटर बायपास करून वीज चोरी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महावितरणच्या फिरत्या पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (प्रभारी) आकाश विनायक येरमे (वय ३३) यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पटवारी कॉलनी, वणी येथील घरगुती वीज ग्राहक क्र. ३७००२४१७६२४१ (मीटर क्रमांक ४०४४८७८८) याची तपासणी करण्यात आली. सदर वीज मीटर एक फेज, दोन वायर, ५–३० एमपी क्षमतेचे असून, तपासणीदरम्यान मीटरच्या इनकमिंग टर्मिनलमध्ये अतिरिक्त वायर जोडून एमसीबी (MCB) स्वीचला थेट कनेक्शन देत मीटर बायपास केल्याचे निदर्शनास आले.
या बेकायदेशीर जोडणीमुळे मीटरमध्ये कमी वीज वापर नोंदवला जात असल्याचे स्पष्ट झाले. ही कृती लबाडीने, अप्रामाणिकपणे व अवैध मार्गाने वीज वापर करून महावितरण कंपनीची वीज चोरी केल्याची असल्याचे भरारी पथकाने नमूद केले आहे. या वीज चोरीतून एकूण २,६५२ युनिट वीजेचा अपहार करून सुमारे ६०,४८० रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासणीत आढळलेला एकूण विद्युत जोडभार १.९७ किलोवॅट असून, त्यासाठीची तडजोड रक्कम ४,००० रुपये निश्चित करण्यात आली होती. सदर प्रकरण तडजोडीचे असतानाही संबंधित ग्राहकाने आजपर्यंत दंड व तडजोड रकमेचा भरणा न केल्याने, अखेर भारतीय विद्युत कायदा २००३ (सुधारित २००७) कलम १३५ अंतर्गत वीज चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, महावितरण प्रशासनाने वीज चोरी करणाऱ्यांना कडक इशारा देत, बेकायदेशीर जोडण्या तात्काळ काढून घ्याव्यात, अन्यथा दंडासह फौजदारी कारवाईस सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले आहे. भविष्यातही शहर व ग्रामीण भागात अचानक मीटर तपासणी मोहिमा राबवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

No comments: