Latest News

Latest News
Loading...

तपासात वेग व अचूकता; वणी पोलिसांचे गुन्हे उघडकीस आणण्यात उल्लेखनीय यश


 प्रशांत चंदनखेडे वणी :-

गुन्ह्यांच्या तपासात वेग, अचूकता आणि सातत्य राखत वणी पोलीस स्टेशनने सन २०२५ मध्ये प्रभावी कामगिरी बजावली आहे. वर्षभरात नोंद झालेल्या गंभीर व मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा बारकाईने तपास करून बहुसंख्य गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

सन २०२५ अखेरीस वणी पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण ७८५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यामध्ये खून ६, खुनाचा प्रयत्न २, दरोडा १, जबरी चोरी १, घरफोडी १९, चोरी ७१, दुखापतीचे ६३ तर प्राणांतिक अपघातांच्या ३५ गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय दारूबंदीचे ६७, जुगाराचे १०८ आणि इतर ४४९ गुन्हे नोंद झाले आहेत.

भाग १ ते ५ अंतर्गत नोंद झालेल्या ३०० गुन्ह्यांपैकी २४७ गुन्हे वणी पोलिस स्टेशनने यशस्वीरीत्या उघडकीस आणले आहेत. तपासाधीन असलेले गुन्हे केवळ ३१ असून, प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण १०.३३ टक्के इतके कमी आहे. भाग ६ अंतर्गत ४८४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वणी पोलिसांचे तपास कौशल्य विशेषत्वाने दिसून आले आहे. घरफोडीच्या १९ गुन्ह्यांपैकी १० गुन्हे उघडकीस आणत ४३ लाख ७३ हजार ८१७ रुपयांपैकी १६ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तसेच चोरीच्या ७१ गुन्ह्यांपैकी ३६ गुन्ह्यांचा छडा लावून पोलिसांनी १ कोटी ६ लाख ९६ हजार २०६ रुपयांपैकी ७४ लाख ७२ हजार ३५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. वणी पोलिसांनी एकूण मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये ६३ टक्के मुद्देमाल हस्तगत करून आपल्या तपास कौशल्याची छाप सोडली आहे.

वेळीच मिळालेल्या गोपनीय माहितीचा वापर, तांत्रिक विश्लेषण, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि तपासातील समन्वय यामुळे गुन्हे उघडकीस आणणे शक्य झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या कामगिरीमुळे गुन्हेगारांवर अंकुश निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

No comments:

Powered by Blogger.