अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी केळापूर सत्र न्यायालयाने सुनावली आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
प्रशांत चंदनखेडे वणी :-
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात केळापूर सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने २ जानेवारीला हे प्रकरण निकाली काढले. या प्रकरणाची सुनावणी करतांना न्यायालयाने आरोपीला २० वर्षे तुरुंगवास व दंड अशी शिक्षा सुनावली असून दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. वणी तालुक्यातील नायगाव येथे ही घटना घडली होती. प्रशांत ठाकरे (२५) रा. नायगाव (खु.) असे या अत्याचार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वणी तालुक्यातील नायगाव (खु.) येथे राहणाऱ्या प्रशांत ठाकरे याने अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. मुलीचे आई, वडील व भावाला जीवे मारण्याची धमकी देत त्याने मुलीवर बळजबरी केली. मात्र भीती पोटी तिने कुणालाही आपबिती सांगितली नाही. परंतु काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला आधी वणी व नंतर नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यानंतर जे समोर आले ते अतिशय धक्कादायक होते. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलगी शारीरिक संबंधाची शिकार झाल्याचे कळताच आई वडिलांचे अवसानच गळाले. त्यानंतर या प्रकरणाची रुग्णालयामार्फत आधी अजनी (नागपूर) पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. अजनी पोलिस स्टेशनमध्ये आरोपीवर पोक्सो व विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु घटना वणी पोलिस स्टेशन हद्दीतील असल्याने प्रकरण वणी पोलिस स्टेशनकडे सोपविण्यात आले.
वणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रदीप ठाकरे याला अटक केली. एपीआय माया चाटसे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण पुरावे गोळा केले. सक्षम पुव्यानिशी त्यांनी न्यायालयात दोषापत्र दाखल केले. त्यानंतर या प्रकरणात सरकारी पक्षातर्फेही भक्कमपणे बाजू मांडण्यात आली. सरकारी वकील ऍड. प्रशांत मानकर यांनी आरोपीला शिक्षा होण्याकरिता प्रभावीपणे युक्तिवाद केला. या प्रकरणात एकूण ७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आल्यानंतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश अभिजित एम. देशमुख यांनी आरोपीला दोषी ठरवत हे प्रकरण निकाली काढले. सर्व साक्ष पुराव्यांच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपी प्रशांत ठाकरे याला २० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षाचे वकील ऍड. प्रशांत मानकर, तपास अधिकारी एपीआय माया चाटसे व पोलिस शिपाई अविनाश बानकर तथा कोर्ट पैरवी पोलिस नाईक संतोष मडावी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

No comments: