Latest News

Latest News
Loading...

वणी गोळीबार : काळजावर कोरलेली जखम! गोळीबारातील हुतात्म्यांना ५२ वर्षांनंतरही लाल सलाम

प्रशांत चंदनखेडे वणी :-

महागाईविरोधातील जनआंदोलनाचा आवाज गोळ्यांनी दाबण्याचा प्रयत्न झालेला २ जानेवारी १९७४ हा दिवस आजही वणीकरांच्या स्मरणात काळा दिवस म्हणून कोरला गेला आहे. नवीन वर्षाचा दुसराच दिवस… रस्त्यावर उतरलेली सामान्य जनता, महागाईच्या आगीने होरपळलेले संसार आणि त्यावर पोलिसांचा अंधाधुंद गोळीबार! या घटनेत सात निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आणि वणीचा इतिहास कायमचा रक्तरंजित ठरला.

सन १९७४ मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारच्या काळात देशासह महाराष्ट्रात महागाईने कळस गाठला होता. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले होते. याच पार्श्वभूमीवर महागाई विरोधी कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. वणी येथेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व पुरोगामी संघटनांनी २ जानेवारी रोजी आंदोलनाचे आयोजन केले होते.

मात्र सरकारविरोधी आंदोलन असल्याने आंदोलनाच्या एक दिवस आधीच कृती समितीचे प्रमुख नेते कॉ. शंकरराव दानव व इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. ही बाब २ जानेवारी रोजी सकाळी जनतेच्या लक्षात येताच संतापाचा उद्रेक झाला. हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोलनाला वेगळे वळण लागले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

टिळक चौक परिसरात जमलेल्या जमावाला पांगविण्याच्या नावाखाली पोलिसांनी प्रथम लाठीचार्ज, त्यानंतर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात राजेश चिंडलिया (१७), भास्कर मांडवकर (२२), वासुदेव वाघ (२२), कवडू सुतसोणकर (२५), पुणाजी गिरडे (५९), रामकृष्ण झिलपे (६०) व दौलत पुंड या सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण आयुष्यभर न भरून येणाऱ्या जखमा घेऊन जगत राहिले.

हा गोळीबार केवळ सात व्यक्तींचा मृत्यू नव्हता, तर लोकशाही मूल्यांवर झालेला घाला होता. संपूर्ण वणी शहर हादरून गेले. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. आजही त्या हुतात्म्यांच्या घरांमध्ये २ जानेवारी हा दिवस अश्रूंनीच उजाडतो.

या रक्तरंजित घटनेच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी आणि हुतात्म्यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी २ जानेवारी रोजी वणीतील टिळक चौकात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व नातेवाईकांच्या वतीने गोळीबारातील हुत्त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पक्षाचे तत्कालीन लढवय्ये नेते कॉ. शंकरराव दानव यांनाही श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य समिती सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, कॉ. सरिता दानव, कॉ. विष्णू दानव तसेच हुतात्म्यांचे नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन मिनिटे मौन पाळून, मेणबत्त्या प्रज्वलित करत, पुष्पहार अर्पण करून *“हुतात्म्यांना लाल सलाम”*च्या घोषणांनी परिसर भारावून गेला. महागाईविरोधातील लढा अजूनही संपलेला नाही आणि त्या लढ्याची प्रेरणा या हुतात्म्यांकडूनच मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

५२ वर्षे उलटून गेली तरी वणी गोळीबाराची जखम अजून भरून निघालेली नाही. कारण हा केवळ इतिहास नाही… तो लोकशाहीच्या स्मरणात कायम कोरलेला रक्ताक्षराचा ठसा आहे.

No comments:

Powered by Blogger.