एमएसबीटीई हिवाळी (२०२५) परीक्षेत सुशगंगा तंत्रनिकेतन कॉलेजचा दैदीप्यमान निकाल, गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिस्तबद्ध मार्गदर्शनाचे यशस्वी फलित
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहरालगत असलेल्या नायगाव येथील सुशगंगा तंत्रनिकेतन कॉलेजने एमएसबीटीई (महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ) हिवाळी (२०२५) परीक्षेत उत्कृष्ट निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
महाविद्यालयात राबविण्यात येणारी गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, नियमित वर्ग, नियोजनबद्ध अभ्यासक्रम व सातत्यपूर्ण सराव यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेत घवघवीत यश मिळाले आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवून महाविद्यालयाचे नावलौकिक वाढवले आहे.
या यशामागे महाविद्यालयाच्या प्राचार्या पुष्पाराणी यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या शिस्तबद्ध सूचना, वेळोवेळी घेतलेले शैक्षणिक आढावे तसेच प्रत्येक विद्यार्थ्यावर दिलेले वैयक्तिक लक्ष यामुळेच हा यशस्वी निकाल साध्य झाल्याचे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार व उपाध्यक्ष मोहन बोनगिरवार यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्या व प्राध्यापकवर्गाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशीच यशाची घोडदौड कायम ठेवावी, अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
सुशगंगा तंत्रनिकेतन कॉलेजचे हे यश ग्रामीण भागातील तांत्रिक शिक्षणाच्या प्रगतीचे प्रतीक ठरत असून, आगामी काळातही महाविद्यालय उत्तम अभियंते व तंत्रज्ञ घडवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

No comments: