प्रशांत चंदनखेडे वणी :-
स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून वणी तालुक्यातील पेटूर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पेटूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या शिबिरात सुमारे २०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
पेटूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रविण झाडे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराला गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रपंचाच्या ओढाताणीत व वाढत्या आरोग्य खर्चामुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी आजारांचे वेळीच निदान होत नसून ते अधिक गंभीर स्वरूप धारण करतात. ही बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळावी व आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उदात्त हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले.
या महाआरोग्य शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी तथा परिचारिका व आरोग्य सेवक, सेवकांनी निःस्वार्थ भावनेने सेवा दिली. सर्वसामान्य नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून थेट तपासणी व मार्गदर्शन मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पेटूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रविण झाडे, उपसरपंच गजानन ढेंगळे, सदस्य खुशाल कोयताडे, माया झाडे, सुनिता जुनगरी, अनिता ढेंगळे, पपिता किनाके व ग्रा.प. कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजसुधारकांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला असून नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे.


No comments: