प्रशांत चंदनखेडे वणी :-
शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आला आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं आलं तरी शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र सुटले नाही. शेतकऱ्यांची परवड अजूनही सुरूच आहे. आज घडीला शेतकऱ्यांची पुरती दैना झाली आहे. शेतकरी देशोधडीला आला आहे. शेतीचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे, पण त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात भरडला जात आहे. त्यातच निसर्गाचा लहरीपणा व कोप शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजला आहे. शेती पिकवूनही शेतमालाला न मिळणारा योग्य भाव व नैसर्गिक आपत्तीने शेतीचं नुकसान झाल्यानंतर मिळणारी तुटपुंजी आर्थिक मदत यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे. आणि याच विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडू लागला आहे. एवढेच नाही तर कर्जाची परतफेड करण्याकरिता आता शेतकऱ्यांना आपली किडनी विकावी लागत आहे. त्यामुळे आता आत्महत्या करून लाचारीचं मरण पत्करण्यापेक्षा आपल्या हक्कांसाठी मैदानात उतरून लढलं पाहिजे. शेतात राबणारी शेतकऱ्यांची ताकद आता सरकारला दाखवून दिली पाहिजे. पक्ष आणि जातपात बाजूला ठेऊन शेतकरी म्हणून एकजुटीने लढा देऊन सरकारला वठणीवर आणलं तरच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. आणि शेतकरी आपल्या हक्कांसाठी सरकारविरुद्ध एकीने लढा द्यायला तयार असेल तर बच्चू कडू शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याकरिता सदैव मैदानात उभा दिसेल, असा एल्गार शेतकरी नेते बच्चू कडू यांनी महाएल्गार शेतकरी मेळाव्यात केला.
शहरातील शासकीय मैदानावर आयोजित महाएल्गार शेतकरी मेळाव्याला संबोधित करतांना ते बोलत होते. बच्चू कडू यांनी आपल्या पहाडी आवाजातील रोकठोक भाषणातून शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलं. ते पुढे बोलतांना म्हणाले की, शेतकरी जोपर्यंत एकवटणार नाही, तोपर्यंत शेती व शेतकऱ्यांचे दिवस पालटणार नाही. जाती पातीच्या राजकारणात पडून पक्षाचा झेंडा हातात घेऊन पक्षाची चाकरी करण्यापेक्षा शेतकरी संघटन मजबूत करण्यावर जोर दिल्यास शेतकऱ्यांना मरणांकित यातना सहन कराव्या लागणार नाही. सरकार नेहमीच गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग व सर्वसामान्यांवर अन्याय करत आलं आहे. तरीही आपण आपापसात व जातीजातीत भांडतो आहे. जातीपातीचा पगडा आणखीच घट्ट करण्याचं हे षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे. जातीपातीचा विषय आला की आपण पेटून उठतो, पण शेतकरी आत्महत्या करत असतांना आपल्या धमन्यातलं रक्त मात्र सळसळत नाही. परभणीतील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्याच पाठोपाठ त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केली, त्यावेळी तिच्या पोटात गर्भ वाढत होता, एका कुटुंबातील तीन निष्पाप जीव मरणाच्या दारात लोटले जातात, तेंव्हा आपलं रक्त का खवळत नाही.
नागभीड तालुक्यातील शेतकऱ्याला कर्जापोटी आपली किडनी विकावी लागली, त्यावेळी आपलं रक्त का उसळत नाही. फक्त जातीपातीचा विषय आला की, आपला अहंकार जागा होतो. आणि शेतकरी आत्महत्या करत असतांना आपल्यातली माणुसकी दम तोडते, हे महाराष्ट्रातलंच नाही तर देशातलं विदारक चित्र आहे. हे विदारक चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी जातीपातीच्या बाहेर पडून शेतकरी एकतेचं दर्शन घडवलं पाहिजे, तेंव्हा कुठे शेतकऱ्यांची परिस्थिती बदलेल. त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून शेतमालाला हमीभावाचा संवैधानिक दर्जा मिळावा व वन्य प्राण्यांपासून सुरक्षा मिळावी, या मागण्यांना घेऊन रामटेक येथून आंदोलनाची सुरवात होणार आहे. रामटेक येथून पदयात्रा काढून ताडोबा येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनात फक्त शेतकरी म्हणून लाखोंच्या संख्येने सहभागी व्हायचं आहे. तसेच ३० जूनपर्यंत सरकारने व्यवस्थित कर्ज माफी न केल्यास १ जुलैला रेल्वेची चाकं थांबविण्याची देखील तयारी ठेवावी लागणार आहे, असे खणखणीत वक्तव्य महाएल्गार शेतकरी मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या बच्चू कडू यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर शेतकरी नेते वामनराव चटप, राजन क्षिरसागर, अनिल हेपट, सतिश देरकर, प्रा. पुरुषोत्तम पाटील, दिपक चटप, विजय नवल, देवराव धांडे, अरुण नवले, हेमंत इसनकर, दशरथ बोबडे, मोबीन शेख, रघुवीर कारेकर यांच्यासह शेतकरी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनीही सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर आपल्या मनोगतातून कडाडून टीका केली. शेतकऱ्यांच्या या आत्महत्या नसून सरकारने शेतकरी विरोधी धोरण राबवून केलेल्या या हत्या आहेत, असे उद्गार यावेळी काढण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संदीप गौरकार यांनी केले. या महाएल्गार मेळाव्याला तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. बच्चू कडू यांचं भाषण ऐकण्याकरिता भर उन्हात शेतकरी बसले होते. आणि त्यांचं भाषण संपत पर्यंत शेतकरी जागेवरून हलले नाहीत.



No comments: