Latest News

Latest News
Loading...

वणीमध्ये राष्ट्रभक्तीचा उत्सव; ७७ वा प्रजासत्ताक दिन थाटात साजरा

प्रशांत चंदनखेडे वणी :-

लोकशाही, संविधान आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांना उजाळा देणारा ७७ वा प्रजासत्ताक दिन शहरातील शासकीय मैदानावर अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत गायनाने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या सोहळ्याला आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावार, संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्षा विद्या आत्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, तहसीलदार निखिल धुळधर, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, माजी सैनिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर पोलीस दल, गृहरक्षक दल, आपदा निवारण पथक तसेच विविध शाळांच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या जवानांनी मान्यवरांना मानवंदना दिली. देशाच्या सुरक्षेसाठी योगदान दिलेल्या माजी सैनिकांचा यावेळी गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना कुष्ठरोग निवारण, बालविवाह प्रतिबंध व तंबाखूमुक्तीची शपथ देऊन सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

यानंतर प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात देशभक्तीपर गीतावर सादर केलेल्या सामूहिक कवायतीने झाली. विद्यार्थ्यांच्या स्फूर्तीदायी सादरीकरणांनी उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक प्रबळ केली.

त्यानंतर सांस्कृतिक स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले. यात प्राथमिक गटात बालविद्या मंदिर प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. तर विवेकानंद विद्यालयाने द्वितीय व नगर परिषद शाळा क्रमांक ६ तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. उच्च प्राथमिक गटात नगर परिषद शाळा क्रमांक ८ प्रथम, नगर परिषद शाळा क्रमांक ७ द्वितीय तर सक्षम इंग्लिश मिडीयम स्कूलचा तृतीय क्रमांक आला. माध्यमिक गटात विवेकानंद विद्यालय प्रथम, स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल द्वितीय तर जनता विद्यालयने तृतीय क्रमांक पटकावला.

पथसंचलन स्पर्धेत एस.पी.एम. हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्र सेनेने प्रथम तर जनता विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावून शिस्त आणि देशभक्तीचे उत्तम दर्शन घडविले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे परीक्षण अभिलाष राजुरकर, जयंत कुचनकर व अमोल बावणे यांनी, तर पथसंचलनाचे परीक्षण माजी सैनिक गजानन मोहितकर व महेश कोहळे यांनी केले.

नायब तहसीलदार विवेक पांडे व गजानन कासावार यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची शिस्त व उत्साह कायम राहिला. संविधानिक मूल्यांची जाणीव करून देणारा हा प्रजासत्ताक दिन वणीकरांच्या स्मरणात कायम राहील, असा भाव यावेळी उपस्थित नागरिकांतून व्यक्त होतांना दिसला.

No comments:

Powered by Blogger.