प्रशांत चंदनखेडे वणी :-
गावातील एका पानठेल्यावर दारू पिण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणावर न्यायालयीन प्रकरण मागे घेण्याच्या कारणावरून वाद घालत दगडाने व हाताबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील नेत या गावात घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
समीर अरुण गिरी (वय १९, रा. नेत, ता. मारेगाव) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. समीर याने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास तो गावातील प्रकाश किशन पुरी (वय ४०) याच्या पानठेल्यावर दारू पिण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याने तेथूनच दारूचे दोन पव्वे घेतले आणि पैसे देऊन तो निघत असतानाच प्रकाश पुरी याने न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणाचा उल्लेख करत सदर न्यायालयीन प्रकरण मागे घेण्याकरिता दबाव टाकला.
मात्र समीरने कोर्टातील केस मागे घेण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपी प्रकाश पुरी याने हातातील दगडाने समीर गिरी याच्या डाव्या कानाजवळ व डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. यावेळी आरोपीसोबत असलेल्या गंगाधर लक्ष्मण उईके (वय ३८, रा. नेत) यानेही फिर्यादीला हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
इतकेच नव्हे तर, “कोर्टातील केस मागे घेतली नाही तर घरातील एखाद्याचा मुडदा पाडू” अशी जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात बीएनएसच्या कलम 118(1), 351(2)(3), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास एएसआय दिंगाबर किनाके करीत आहेत.
या घटनेमुळे नेत गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बेकायदेशीर दारूविक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

No comments: