Latest News

Latest News
Loading...

प्रेस वेलफेअरच्या मंचावर नृत्याची बहार; स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचा करंडकावर सलग चौथा दावा

प्रशांत चंदनखेडे वणी :-

प्रेस वेलफेअर असोसिएशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धा यंदाही अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या स्पर्धेत स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलने उत्कृष्ट सादरीकरण करत सलग चौथ्यांदा फिरता करंडकावर आपले नाव कोरले, ही स्पर्धेतील ठळक बाब ठरली.

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या स्पर्धेत २० शाळांच्या चमूंनी रंगतदार, संस्कृतीदर्शक व कल्पक नृत्यप्रकार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ठाणेदार गोपाल उंबरकर, प्रेस वेलफेरचे अध्यक्ष अनिल बिलोरीया यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष विद्या सचिन आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

पूर्व माध्यमिक गटात शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. संताजी इंग्लिश मिडियम स्कूल द्वितीय, जनता विद्यालय तृतीय, तर नगर परिषद शाळा क्रमांक सातने प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले.

माध्यमिक गटात स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल प्रथम, विवेकानंद विद्यालय द्वितीय, वणी पब्लिक स्कूल तृतीय, तर शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाने प्रोत्साहनपर बक्षीस पटकाविले.

दिव्यांग गटात रामदेवबाबा मुक-बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भावस्पर्शी नृत्याने उपस्थितांची मने जिंकत भरभरून दाद मिळविली.

या प्रसंगी प्रेस वेलफेअर असोसिएशनतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच रवि बेलुरकर यांची नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. आमदार संजय देरकर व शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.

स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य हेमंत चौधरी व नृत्य दिग्दर्शिका आस्था दहेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तुषार अतकारे व गजानन कासावार यांनी केले, तर आभार विनोद ताजने यांनी मानले.

शिस्तबद्ध नियोजन, वेळेचे काटेकोर व्यवस्थापन आणि स्पर्धकांसाठी पोषक वातावरण यामुळे ही स्पर्धा एक आदर्श आयोजन ठरली, अशी उपस्थितांमधून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रेस वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Powered by Blogger.