शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेचे प्रखर नेतृत्व आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड शंकरराव दानव यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त वणी येथे भव्य वैचारिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३१ जानेवारी (शनिवार) रोजी वसंत जिनिंग सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कॉ. शंकरराव दानव यांच्या ७२ वर्षांच्या संघर्षमय जीवनप्रवासात त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच शोषित, वंचित व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी स्वतःला झोकून दिले. समाजकार्यासाठी त्यांनी वैयक्तिक आयुष्याकडेही दुर्लक्ष केले. यवतमाळ जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक भूमिहीन कुटुंबांना शेतजमिनीचे पट्टे मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी व देशासमोर उभ्या असलेल्या गंभीर सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात प्रगत विचारवंत प्रभू राजगडकर (नागपूर) हे “वन जमिनीवरील आदिवासींचे अस्तित्व व त्यांच्या अधिकारांवर होणारे भांडवली विकासाचे अतिक्रमण” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर अरुण लाटकर (नागपूर) हे “राजकारणातील धार्मिक व भांडवली शिरकाव आणि जनतेच्या अधिकारांवरील घाला” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. तसेच यशवंत झाडे हे देशाचे शेती धोरण व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वास्तव यावर सखोल विश्लेषण करणार आहेत.
या कार्यक्रमाला वसंत जिनिंगचे संचालक प्रमोद वासेकर व संवैधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष गीत घोष हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
“कॉम्रेड शंकरराव दानव : व्यक्तित्व आणि संघर्ष” या शीर्षकाखाली होणाऱ्या या वैचारिक प्रबोधन कार्यक्रमाला शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व कष्टकरी जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, जिल्हा अध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम, जिल्हा सचिव व माजी जि. प. सदस्य कॉ. देविदास मोहकर, माजी पं. स. सभापती ॲड. डी. बी. नाईक यांच्यासह मनीष इसाळकर, गजानन ताकसांडे, सदाशिव आत्राम, रामभाऊ जिद्देवार, किसन मोहूरले, कवडू चांदेकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, सुरेखा बिरकुलवार, प्रीती करमणकर, पुंडलिक ढुमने, सुधाकर सोनटक्के, श्रीकांत तांबेकर, ऋषी कुलमेथे, एकनाथ नालमवार आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

No comments: