मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून वणी येथील शासकीय विश्रामगृहात जागृत पत्रकार संघटनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार तथा जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धावंजेवार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना राजू धावंजेवार म्हणाले की, “आजच्या काळात पत्रकारिता करणे अत्यंत आव्हानात्मक झाले आहे. सत्य मांडताना अनेकदा पत्रकारांना मोठी जोखीम पत्करावी लागते. बातमी सर्वात आधी देण्याच्या स्पर्धेत असंख्य न्यूज पोर्टल्स निर्माण झाली असली, तरीही विश्वासार्हतेमुळे वृत्तपत्रांचे महत्त्व आजही अबाधित आहे. कारण सत्याची पडताळणी करून, तथ्यांच्या आधारेच बातमी प्रसिद्ध करण्याची जबाबदारी वृत्तपत्रे प्रामाणिकपणे पार पाडतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेचे बदलते स्वरूप, माध्यमांवरील वाढता दबाव, सामाजिक जाणीव आणि पत्रकारांची जबाबदारी यावर सखोल चर्चा झाली. पत्रकारांनी निर्भीडपणे, पण जबाबदारीने समाजासमोर सत्य मांडावे, असे मनोगत यावेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केले.
मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने ज्येष्ठ पत्रकार राजू धावंजेवार यांचा जागृत पत्रकार संघटनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास जागृत पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संदीप बेसरकर, सचिव मोहम्मद मुस्ताक यांच्यासह पुरुषोत्तम नवघरे, आकाश दुबे, प्रशांत चंदनखेडे, विवेक तोटेवार आदी पत्रकार उपस्थित होते.

No comments: