वणी तालुक्यातील पळसोनी शिवारातील शेतातील सायवानातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३० हजार रुपयांचे शेती उपयोगी साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केशव श्रावण दुधबळे (वय ५०, व्यवसाय शेतमजुरी, रा. पळसोनी, ता. वणी) हे मागील तीन वर्षांपासून पळसोनी शिवारातील दिनेश आनंदराव मालेकार यांच्या मालकीचे सुमारे २५ एकर शेत मक्तेदारीने वहात आहेत. संबंधित शेतात टिनाचे सायवान असून त्यामध्ये शेतीसाठी लागणारे साहित्य ठेवले जात होते.
दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास दुधबळे हे शेतीचे काम आटोपून स्प्रे पंप (किंमत अंदाजे ३ हजार रुपये), झटका मशिन (१० हजार रुपये), बॅटरी (१२ हजार रुपये) तसेच इतर शेती उपयोगी साहित्य (५ हजार रुपये) असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल सायवनात ठेवून घरी गेले होते.
मात्र दुसऱ्या दिवशी दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता ते शेतात गेले असता सायवानमधील सर्व साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आजूबाजूला शोध घेतला असता कोणताही मागमूस न लागल्याने अज्ञात चोरट्याने २ जानेवारी सायंकाळ ते ३ जानेवारी सकाळच्या दरम्यान ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी केशव दुधबळे यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत. शेतातील साहित्यावर डोळा ठेऊन शेती उपयोगी साहित्य लंपास करण्याचे प्रकार वाढू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments: