तो होता सोने खरेदी करण्यात व्यस्त आणि चोरट्यांनी केली करामत, बालाजी ज्वेलर्ससमोरून भरदिवसा स्प्लेंडर प्लस लंपास
वणी शहरातील मुख्य बाजारपेठेत भरदिवसा दुचाकी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बालाजी ज्वेलर्ससमोरून अज्ञात चोरट्याने हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस दुचाकी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साखरा (कोलगाव) ता. वणी येथील रहिवासी बंडु दादाजी उपासे (वय ६३) हे २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कुटुंबीयांसह वणी शहरातील बालाजी ज्वेलर्स येथे सोन्याचे दागिने खरेदीसाठी आले होते. यावेळी त्यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्रमांक MH 29 S 7908) दुकानासमोर उभी केली होती.
सोन्याचे दागिने खरेदी करून दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास ते दुकानाबाहेर आल्यानंतर त्यांना तेथे दुचाकी आढळून आली नाही. आजूबाजूला व परिसरात शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची त्यांना खात्री पटली. त्यामुळे ६ जानेवारीला त्यांनी वणी पोलीस स्टेशन येथे येऊन दुचाकी चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. बंडू उपासे यांच्या तक्रारी वरून पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर दुचाकी मागील १८ वर्षांपासून दैनंदिन कामासाठी वापरात असल्याने या चोरीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
वणी पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून पुढील तपास सुरू आहे. शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी वाहनांची काळजी घेण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

No comments: