अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत वणी शहरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध विभागाच्या संयुक्त पथकाने धडक मोहीम राबवून प्रतिबंधित साठा जप्त केला. शहरातील विविध भागांत अचानक छापे टाकत (दि. १२ फेब्रुवारी २०२६) कारवाई करण्यात आली.
राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार टिळक चौक, बसस्टँड परिसर, गांधी चौक आदी भागांतील किरकोळ दुकाने व पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वणी–यवतमाळ रोडवरील माऊली कोल्ड्रिंक डेली नीड्स येथे गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले.
या कारवाईत अंदाजे ६०० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा आणि सुमारे एक हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी विक्रेता अरुण शेलघरे (रा. तेली फैल, वणी) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम २०११ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील करीत आहेत. प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्यास तत्काळ ही माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासन व अन्न सुरक्षा विभागाने नागरिकांना केले आहे.
शहरात अशा प्रकारच्या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील काळातही संयुक्त कारवाया सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

No comments: